सलमानने मला काचेवर आदळलं अन् माफीसुद्धा मागितली नाही..; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
अभिनेता सलमान खान अनेकदा त्याच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतो. चित्रपटाच्या सेटवरील त्याच्या वादाचे किस्से काही नवीन नाहीत. असाच एक सलमानचा किस्सा सध्या चर्चेत आला आहे. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटातील अभिनेता आदि इराणीने सलमानसोबतच्या शूटिंगचा हा किस्सा सांगितला आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान सलमानने आदिला काचेच्या भिंतीवर आपटलं होतं. त्यानंतर त्याला दुखापत झाली होती आणि रक्तस्रावही होऊ लागला होता. तरीसुद्धा सलमान त्याची माफी न मागताच तिथून गेल्याचं आदिने सांगितलं. अखेर दुसऱ्या दिवशी अपराधीपणा वाटल्यानंतर सलमानने आदिला त्याच्या रुममध्ये बोलावलं आणि तेव्हा त्याने त्याची माफी मागितली.
‘फिल्मीमंत्रा मिडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आदि म्हणाला, “चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने मला काचेच्या फ्रेमवर ढकललं होतं. तेव्हा काचेचे तुकडे माझ्या चेहऱ्यावर रुतले होते आणि माझा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. ती घटना खूप भयंकर होती.” या चित्रपटात आदिने सलमानच्या मित्राची भूमिका साकारली होती. तर शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ या चित्रपटात विकी मल्होत्राची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला होता. सलमानसोबत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिला गंभीर दुखापत झाली होती. परंतु त्यावेळी शूटिंगला नकार दिला असला तर निर्मात्यांच खूप मोठं नुकसान झालं असतं, असं तो पुढे म्हणाला.
“मी निर्मात्यांना साथ दिली आणि फक्त माझ्या उपचारासाठी डॉक्टरांना बोलवायला सांगितलं होतं. चेहऱ्यावरील रक्तस्राव कमी झाल्यानंतर मी त्यावर पांढरी पट्टी लावायला सांगितली. जेणेकरून मेकअप केल्यानंतर ते माझ्या स्कीन कलरशी मिळतंजुळतं दिसेल. मी निर्मात्यांना सल्ला दिला की तुम्ही हे एका शॉटसाठी असं करा. मग असा शॉट घ्या, जिथे माझं डोकं काचेच्या फुलदाणीवर आदळतं आणि त्यानंतर जर माझ्या डोक्यातून उर्वरित दृश्यात रक्त येत असेल तर ते आदळल्यामुळे झाल्यासारखं दिसेल. निर्मात्यांनाही हे समाधानकारक वाटलं आणि पुढे शूटिंग पूर्ण केलं”, असं आदिने सांगितलं.
या घटनेबाबत सलमानची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचारला असला आदि म्हणाला की तो थेट त्याच्या रुममध्ये निघून गेला होता. “मला दुखापत झाल्यानंतर तो सेटवरून निघून गेला. तो तिथून थेट त्याच्या रुममध्ये गेला होता. त्याने मला सॉरी किंवा काहीच म्हटलं नव्हतं. सेटवर तेव्हा प्रिती झिंटासुद्धा उपस्थित होती. ती माझ्याकडे काळजीने धावून आली होती. त्या दुखापतीनंतरही मी माझं शूटिंग पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी सलमानने मला त्याच्या रुममध्ये बोलावलं”, असं तो पुढे म्हणाला.
“दुसऱ्या दिवशी सलमानने मला बोलावून म्हटलं, आदि.. मला खरंच माफ कर. मला खूप वाईट वाटतंय. मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलूसुद्धा शकत नाहीये. मला इतकं वाईट वाटतंय. तेव्हा मी सलमानला समजून घेतलं. ठीक आहे, असं होत राहतं.. असं त्याला म्हटलं. त्याला खरंच खूप वाईट वाटलं होतं. काही लोक लगेच माफी मागतात आणि काही लोकांना अपराधीपणा वाटतो पण ते लगेच समोरच्या व्यक्तीची माफी मागू शकत नाहीत. सलमान त्यातलाच एक आहे”, असं आदिने स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List