लढाऊ विमान बनवणाऱ्या ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला 55 लाखांचा गंडा, बनावट Email आयडी बनवून फसवणूक
लढाऊ विमान बनवणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) सायबर ठगांनी 63 हजार डॉलरचा (जवळपास 55 लाख रुपये) गंडा घातला आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एचएएलने अमेरिकेतील एका कंपनीशी लढाऊ विमानाचे पार्टस खरेदी करण्याचा सौदा केला होता. या कंपनीशी मिळतीजुळती बनवाट वेबसाईट बनवत सायबर ठगांनी आपल्या खात्यामध्ये पेमेंट करून घेतले. पेमेंट केल्यानंतरही लढाऊ विमानाच्या पार्टसची ऑर्डर न आल्याने एचएएलने अधिक चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर एचएएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक अशोक कुमार सिंह यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आयटी अॅक्ट अन्वये अज्ञातांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी लढाऊ विमानांची निर्मिती करते. याच कंपनीला तेजस विमानांचीही ऑर्डर मिळालेली आहे. लढाऊ विमानांसह ही कंपनी डोनियर विमानांचीही निर्मिती करते. ही कंपनी आपल्या विमानांसाठी काही पार्टस विदेशांधून आयात करते. कंपनीने विमानाचे तीन पार्ट खरेदी करण्यासाठी एमएस पी.एस इंजिनियरिंक इनकॉर्पोरेटेडेट, यूएस या अमेरिकेच्या कंपनीशी संपर्क साधला होता. एचएएलने 3 मे 2024 रोजी या संदर्भात कोटेशनही मागवले होते. [email protected] हा अमेरिकन कंपनीचा ई-मेल आयडी होता.
एचएलएल आणि अमेरिकन कंपनीमध्ये होत असलेल्या व्यवहाराची माहिती सायबर ठगांना मिळाली. त्यांनी अमेरिकन कंपनीशी मिळताजुळता ई-मेल आयडी बनवला आणि एचएएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. याचाच वापर करत सायबर ठगांनी एचएएलकडून 63,405 डॉलर आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. पेमेंट झाल्यानंतरही ऑर्डर न मिळाल्याने एचएएलने अधिक तपास केला असून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सायबर ठगांचा शोध घेण्यासाठी आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List