मी एकटा आलो अन्..; मृत्यूपूर्वी औरंगजेबाचे अखेरचे शब्द काय होते?
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली आहे. या चित्रपटामुळे आजच्या पिढीलाही इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यात रस निर्माण झाला आहे. ‘छावा’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये पहायला मिळतं की आपल्याच जवळच्या लोकांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज मुघलांकडून पकडले जातात आणि त्यानंतर औरंगजेब त्यांना धर्मांतर करण्यास सांगतो. मात्र छत्रपती संभाजी महाराज धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर औरंगजेब त्यांचा अतोनात छळ करतो. यानंतर पुढे औरंगजेबाचं काय होतं, हे चित्रपटात दाखवलं नाही. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नाने क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक होत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर मराठे एकत्र आले. मुघलांविरुद्धच्या त्यांच्या प्रतिकाराला आणखी बळकटी मिळाली. औरंगजेब हा सहावा मुघल सम्राट होता. त्याने 1658 पासून 1707 पर्यंत राज्य केलं. औरंगजेब इतका क्रूर होता की त्याने त्याच्या वडिलांना कैद करून आणि मोठ्या भावाला ठार मारून गादी मिळवली होती. इतिहासकारांनी त्याचं वर्णन अत्याचारी म्हणून केलंय.
अखेर 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला. त्याला खुलदाबाद इथल्या एका खुल्या जागेतील कबरीत दफन करण्यात आलं. इंडोलॉजिस्ट स्टॅन्ली वोल्पर्ट म्हणाले की, “मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचलेल्या औरंगजेबाचे त्याच्या मुलासमोर अखेरचे शब्द असे होते की, मी एकटा आलोय आणि अनोळखी म्हणून जातोय. मला माहीत नाही की मी कोण आहे आणि मी काय करतोय.” काही अहवालांमध्ये असंही नमूद केलंय की औरंगजेबाचे शेवटचे शब्द “माझ्यानंतर, अराजकता” असे होते.
‘छावा’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा इतिहासाची पानं उलगडली गेली आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरात आतापर्यंत 433.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘छावा’ची आतापर्यतची जगभरातील कमाई ही 590 कोटींवर पोहोचली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List