Crime news – श्रीगोंदाजवळ 19 वर्षीय तरुणाची क्रूर हत्या; हात-पाय, मुंडके तोडून विहिरीत टाकले
हाविद्यालयीन 19 वर्षीय तरुणाची थंड डोक्याने हत्या करून, त्याचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाचे हात-पाय, मुंडके तोडून दोन पोत्यांत भरून विहिरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना शिरूर-श्रीगोंदा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडीत उघडकीस आली. माउली सतीश गव्हाणे (वय – 19, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरसह पुणे जिल्हा हादरला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
माउली गव्हाणे हा दाणेवाडी गावाजवळच महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याची क्रूरपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच माउलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. खून करणाऱ्या आरोपींनी कुठलाही पुरावा मागे न ठेवल्याने पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा कस पणाला लागला आहे. दरम्यान, खून करणाऱ्या हल्लेखोरांनी अतिशय शांतपणे माउलीचा खून करून त्याचे हात-पाय, मुंडके कटरच्या साहाय्याने वेगळे केले. ते अवयव दोन पोत्यांत भरून विहिरीत फेकून दिले.
शिरूर पोलीस ठाण्याअंतर्गत माउली गव्हाणे याची ‘मिसिंग’ची नोंद आहे. त्यांच्याच गावातील तरुणीने त्याला महाविद्यालय परिसरात पाहिले होते. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र, तपासात काहीही निष्पन्न झाले नाही. माउली हा बारावी परीक्षेसाठी गैरहजर असल्याचेही संबंधित कॉलेज प्रशासनाने सांगितले असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. हल्लेखोरांचा शोध लवकर न लागल्यास 18 मार्चला दाणेवाडी गावकरी, तसेच सकल गोपाळ समाजाने पुणे नगर महामार्गावर शिरूरजवळ ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
6 मार्चनंतर माउली गव्हाणे याचा कुटुंबीयांसमवेत संपर्क नाही
माउली हा 6 मार्चला रात्री साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत घराजवळ होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे आरोपी हे दाणेवाडी परिसरातीलच आहेत की आणखी कुठले? याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांच्या श्वान पथकालाही दोन वेळा पाचारण केले होते. पोलीस चोहोबाजूंनी या गुन्ह्याचा तपास करत असून, वेगवेगळ्या पद्धतीने तपासात काही दिशा मिळते का? काही पुरावा मिळतात का? याची पडताळणी करत आहेत.
“दाणेवाडीतील 19 वर्षीय तरुणाच्या खुनाचा तपास बेलवंडी पोलिसांकडून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे वर्ग केला आहे. त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे.”
संतोष भंडारे, पोलीस निरीक्षक, बेलवंडी, अहिल्यानगर
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List