प्रासंगिक – छत्रपती शिवरायांचे भाषाप्रेम!
>> योगेंद्र ठाकूर
आपल्या देशात भाषिक राज्ये होऊन 75 वर्षे झाली. महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन 65 वर्षे झाली, परंतु अजूनही महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठी भाषेतून सुरू नाही. महाराष्ट्रातील न्यायालयातील कारभार मराठीतून चालत नाही. त्यामुळे सामान्य लोकांना अडचण होते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी ही राजभाषा असेल असे राज्य सरकारने घोषित केले होते. राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षी 1 मे 1985 पासून संपूर्ण शासकीय कामकाज मराठीतून करावे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांत वेळोवेळी अध्यादेशही काढले तरी अजून शासकीय कारभाराची भाषा 100 टक्के मराठी होऊ शकली नाही.
राज्यकारभार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकभाषा परिणामकारक ठरते. लोकव्यवहारात लोकभाषा हा लोकाधिकार असतो हे आजच्या राज्यकर्त्यांना कळत नाही, पण तेच जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना 360 वर्षांपूर्वी कळले होते. त्या वेळी म्हणजेच शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे करून फारसी होती. कोणतीही भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारसी समजण्यात खूप अडथळा येत होता आणि लोकव्यवहरात अडचणही होत होती. रयतेला राज्यकारभार कसा चालला आहे हे पूर्णपणे कळत नव्हते. तेव्हा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले. मग त्यांनी विचारपूर्वक ‘राजभाषाकोश’ करायचं ठरवलं आणि काम सुरू केलं. मग प्राकृतात कारभार सुरू झाला. तो लोकांना आपला वाटू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य लोकांना आपले वाटू लागले. राज्यकारभारात लोकसहभाग वाढू लागला आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींचे राज्य हे ‘लोकाभिमुख’ झाले.
शहाजी महाराजांना मराठी, संस्कृत, फारसी व कानडी या भाषा उत्तम येत होत्या. त्यांच्या वेळी अनेक गुणी कलाकार, विद्वान कवींना राजाश्रय मिळत होता. त्यांच्या दरबारी 50 संस्कृत पंडित आणि 30-35 प्राकृत पंडित होते. त्यांच्या बंगलोरमधील गौरीविलास महालात कवी जयराम पिंडे यांनी ‘राधामाधव विलास चंपू’ हा गद्य-पद्य ग्रंथ ऐकवला. या ग्रंथात शहाजीराजांचा जीवनक्रम व दिनचर्या याचे सुरेख वर्णन केले आहे. शहाजी महाराजांकडे जयराम पिंडे तीन वर्षे होते. त्या काळात त्यांनी शहाजी महाराज यांचे चरित्र बारा भाषांमध्ये लिहिले. शहाजी महाराजांना संस्कृतचे ज्ञान होते. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजमुद्रा करून दिली. ती संस्कृतमध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारी अनेक राजाश्रित कवी होते. त्यात कवींद्र परमानंदांकडून ‘शिवभारत’, रघुनाथपंत हणमंते वळसगावकर यांच्याकडून खास शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून भाषाशुद्धीसाठी ‘राजव्यवहारकोश’ लिहून घेतला. त्यांनी धुंडीराज व्यास यांच्या सहकार्याने हा कोश तयार करून घेतला. या कोशाची निर्मिती शिवाजी महराज यांच्या द्रष्टय़ा लोकनायकाचे मूर्तिमंत प्रतीक आहे. या कोशाच्या निर्मितीचे प्रयोजन असे की, शिवाजी महाराजांना अनेक राजांची पत्रे येत असत. त्या पत्रांमध्ये उर्दू, फारसी, हिब्रू या भाषांची सर्रास सरमिसळ दिसून येत असे. राजव्यवहारात प्रचलित फारसी, दख्खनी, उर्दू भाषांच्या बोलीभाषेत शब्द रूढ होऊ लागले व त्याचा परिणाम भाषेत होणारी भेसळ महाराजांच्या लक्षात आली. भाषेचे संस्कारित स्वरूप असायला हवे असा दूरगामी विचार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टोत्पत्तीस आला आणि राजव्यवहारकोशाची निर्मिती झाली. या कोशाच्या उपोद्घात रघुनाथ पंडित यांनी आग्रही भूमिका घेत नमूद केले आहे की, ‘तख्त’ हा फारसी शब्द आहे. त्याला ‘सिंहासन’ हा संस्कृत पर्यायी शब्द दिला आहे. या कोशाचे महत्त्व विशेषतः सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे दर्शन घडविणारे ऐतिहासिक साधन म्हणून आहे.
शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजेदेखील संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते. त्यांनी ‘बुधभूषण’ नावाचा ग्रंथ लिहिला. यावरून शिवकाळात संस्कृत भाषेलाही उत्तम स्थान प्राप्त झाले होते ते केवळ राजाश्रयामुळे हे प्रकर्षाने लक्षात येते.
इतिहास लेखक सेतुमाधवराव पगडी यांनी शिवाजी महाराजांना ‘फारसीचा पहिला कोशकार’ म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी भीमजी पारेख या गुजराती तज्ञाला सुरतेहून बोलावून एक छापखाना काढण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराज हे फक्त मराठी भाषाप्रेमी नव्हते तर महाराज हे शब्दप्रभू होते हे त्यांनी इतर सरदारांना, राजांना पाठवलेल्या पत्रांतून कळते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे हे विविध भाषाप्रेमी होते. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना इतर शिक्षणासह संस्कृत भाषेचे बाळकडू बालपणीच दिले. फक्त 50 वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्यासाठी अनेक लढाया केल्या. हिंदवी स्वराज्य उभारणीत व्यग्र असतानाही मराठी व संस्कृत भाषेला राजाश्रय देऊन त्या भाषांमध्ये ग्रंथ निर्मितीला प्रोत्साहन दिले तसेच लोकव्यवहारात लोकभाषेला महत्त्व प्राप्त करून दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List