हिना खानवर किमोथेरपीचे साइड इफेक्ट्स; फोटो पोस्ट करत ट्रोलर्सना सुनावलं
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानवर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं असून तिच्यावर किमोथेरपीसुद्धा करण्यात आली. किमोथेरपीचे बरेच साइड इफेक्ट्ससुद्धा तिला सहन करावे लागत आहेत. आधी तिने तिच्या डोक्यावरील सर्व केस कापून टक्कल केलं. त्यानंतर आता तिला आणखी एका समस्येचा सामना करावा लागतोय. सोशल मीडियाद्वारे हिना सतत तिच्या आरोग्याविषयी आणि उपचारांविषयी चाहत्यांना माहिती देत आहे. रमजानच्या महिन्यात जेव्हा तिने स्वत:चे काही फोटो पोस्ट केले, तेव्हा तिच्या नखांवरील नेलपॉलिश पाहून काहींनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता हिनाने याच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. नखांवरील रंग हे नेलपॉलिश नसून किमोथेरपीचा साइड इफेक्ट असल्याचं तिने सांगितलं आहे.
नखांचा फोटो पोस्ट करत हिनाने लिहिलं, ‘माझ्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांसोबतच इतर बरेच जण मला माझ्या नखांविषयी प्रश्न विचारत आहेत. मी माझ्या नखांवर नेलपॉलिश लावलेली नाही. नेलपेंट लावून मी प्रार्थना कशी करू शकते? माझ्या प्रिय साथीदारांनो, थोडं तरी डोकं लावा. नखांचा रंग उडणं हा किमोथेरपीचा सर्वसामान्य साइड इफेक्ट आहे. माझी नखं कमकुवत आणि ड्राय झाली आहेत. कधी कधी पूर्ण नखंच निघून येतात. परंतु या सर्वांत चांगली गोष्ट काय माहीत आहे का? हे सर्व टेम्पररी (काही वेळासाठी) आहे आणि लक्षात ठेवा की मी बरी होतेय.’
याआधी अभिनेत्री रोझलिन खानने हिनावर बरीच टीका केली होती. हिना तिच्या कॅन्सरच्या स्टेजविषयी आणि किमोथेरपीच्या उपचारांविषयी खोटं बोलत असल्याचा दावा तिने केला होता. इतकंच नव्हे तर तिने थेट हिनाचे मेडिकल रिपोर्ट्ससुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ‘ती तिसऱ्या स्टेजच्या उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केलाय? गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे,’ अशी टीका रोझलिनने केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List