आज तुकाराम बीज सोहळा, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातून दिंड्या देहूनगरीत दाखल
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज रविवारी (दि. 16) होणाऱ्या तुकाराम बिजेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. या सोहळ्याच्या अनुषंगाने देहूनगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. टाळ-मृदंगांचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबाचा जप करीत राज्यभरातून दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला आहे.
बीज सोहळ्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे तीन वाजता काकड आरतीने होईल. पहाटे चार वाजता शिळा मंदिर महापूजा विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वारकरी यांच्या हस्ते होईल. पहाटे सहा वाजता वैकुंठस्थान महापूजा, सकाळी साडेदहा वाजता पालखी प्रस्थान वैकुंठस्थान मंदिराकडे होईल, नंतर सकाळी दहा वाजता देहूकर महाराज यांचे वैकुंठ सोहळा कीर्तन, दुपारी साडेबारा वाजता मुख्य मंदिरात पालखीचे आगमन होणार आहे.
देहू नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामे करण्यात आली असून पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी यंत्रणा सज्ज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गाथा मंदिर, मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, मुख्य कमान, बीएससी केंद्रामध्ये बाह्यरुग्ण तपासणी केंद्र उभारले असून औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पाश्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List