सुनीता विल्यम्स यांच्या परतीसाठी रॉकेट लाँच
नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आता परत आणण्यासाठी शुक्रवारी नासा आणि स्पेसएक्सने क्रू मिशन यशस्वीरीत्या लाँच केले. हिंदुस्थानी वेळेनुसार पहाटे 4.30 वाजता फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन -9 रॉकेटने उड्डाण केले. क्रू ड्रगन पॅप्सूलशी जोडलेली चार सदस्यांची टीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाली. या मोहिमेला क्रू-10 असे नाव देण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता 19 मार्च रोजी पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे.
क्रू-10 मिशनमध्ये नासाच्या अॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयरेस, जपानी अंतराळ संस्था जाक्साचे ताकुया ओनिशी आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. हे चार अंतराळवीर आयएसएसमध्ये पोहोचतील आणि सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि क्रू-9 मधील इतर दोन सदस्यांची जागा घेतील. क्रू-10 चे अंतराळयान 15 मार्च रोजी अंतराळ स्थानकावर डॉक करेल. त्यानंतर क्रू- 9 मिशन 19 मार्चनंतर कधीही परतेल असा अंदाज आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या बोइंगच्या स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे दोघांचा आठ दिवसांचा प्रवास 9 महिन्यांपर्यंत लांबला आहे. त्यांना पृथ्वीवर आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List