डोक्याला शॉट… आपण रोज दूध नव्हे कपड्याचा साबण पितोय! राज्य सरकारची विधानसभेत कबुली… होय, दुधात भेसळ होतेय
दूध आरोग्यदायी आहे. दुधात कॅल्शिअम, व्हिटॅमीन डी तसेच मुबलक प्रथिने असल्याने दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण हेच दूध आता विष होऊ लागले आहे. कारण दुधामध्ये आरोग्याला हानीकारक युरिया, फार्मेलीन, कॉस्टिक सोडा, डिटर्जंट म्हणजे कपड्याचा साबण असे घातक घटक असल्याचे राज्य सरकारने मान्य केल्याचे विधानसभेतील उत्तरातून पुढे आले आहे. त्यामुळे आपण दररोज दूध पित आहोत की कपड्याचा साबण पित आहोत, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.
राज्यात मोठ्या प्रमाणावर दुधाची भेसळ होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतल्या चार चेक नाक्यांवर जाऊन अचानक धाडी टाकल्या. त्यांनी मुंबईत येणाऱ्या 98 दुधाच्या टँकरची तपासणी केली तेव्हा दुधामध्ये भेसळ झाल्याचे आढळून आले होते. दुधात भेसळ झाल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आगामी काळात दूध, दही किंवा अन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळली तर कारवाईचा इशारा दिला होता.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानिमित्ताने बनावट पनीरचा मुद्दा चर्चेला आला. आमदार विक्रम पिचड यांनी बनावट पनीरचे नमुने विधानसभा अध्यक्षांना सादर केले होते. त्यानंतर आता भेसळयुक्त दुधाचाही मुद्दा पुढे आला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रकाश सोळंके यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने दुधातील भेसळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भेसळीत काय काय….
राज्यात मोठ्या प्रमाणावर दुधामध्ये भेसळ होत असून यात आरोग्याला हानीकारक युरिया, हायड्रोजन पेरॉक्साईड, फार्मेलिन, स्वयंपाकाचे तेल, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, साखर, मीठ इत्यादी अनेक घातक घटकांचा समावेश होत असल्याचे अलीकडेच निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लेखी उत्तरात हे अंशतः खरे असल्याचे मान्य केले आहे.
मानकाप्रमाणे दूध नाही
अन्न व औषध प्रशासनाने 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत दुधाचे 730 नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यातील 50 नमुने कमी दर्जाचे आणि दुधाचे 11 नमुने असुरक्षित घोषित झाले. तर जानेवारीत घेतलेल्या 1 हजार 94 नमुन्यांमध्ये 126 नमुने मानकांप्रमाणे नसल्याचे आढळून आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List