पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी बनतेय ‘कुपोषितनगरी’; शहरात 361 अंगणवाड्यांमध्ये 615 कुपोषित बालके
पिंपरी चिंचवडसारख्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेल्या शहरात कुपोषित बालकांचे प्रमाण वाढत आहे. शहरामध्ये 361 अंगणवाड्या असून, यामध्ये 3 ते 6 वयोगटातील 19 हजार 904 लाभार्थी आहेत. त्यापैकी 615 बालके कुपोषित असल्याचे आढळले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या विविध भागात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत शासनामार्फत 361 अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाडीमध्ये येणारी मुले ही आर्थिक दुर्बल घटकातील, बिगारी काम करणारे, हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांतील आहेत. शासनाकडून येणारा पोषण आहार मुलांपर्यंत योग्य प्रकारे पोचतो का यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना शासनाकडून पोषण आहार पुरविला जातो. हा आहार त्यांना अंगणवाडीमध्येच खाऊ घातला जातो. आहारातील पोषण मूल्य वाढवून मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन अंगणवाडीकडे असते.
कुपोषणासारखी गंभीर स्थिती उद्घते, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आहारात योग्य प्रमाणात पोषक घटक नसतात. याला खराब पोषण म्हणून देखील ओळखले जाते. कुपोषण ही अशी स्थिती आहे, जेव्हा व्यक्तीला आहारात पुरेसे पोषक मिळत नाहीत. वजन आणि उंची या दोन्ही बाबतीत अपेक्षित होत नाही. वर्तनमध्ये बदल जसे की, विलक्षण चिडचिडे, सुस्त किंवा चिंताग्रस्त दिसणे, केस आणि त्वचेच्या रंगात बदल अशा मुलांना कुपोषित बालकांच्या यादीत टाकले जाते.
अंगणवाडीमध्ये दिला जाणारा आहार
अंगणवाडीमध्ये मुलांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचा पोषण आहार दिला जातो. गव्हाची लापशी, मुरमुरा लाडू, भात, तांदळाची खिचडी, शेंगदाणा लाडू, उसळ, राजगिरा लाडू, व्हेज पुलाव, नाचणी लाडू आदी आहार दिला जातो.
पोषण आहाराच्या नोंदीसाठी पोषण ट्रॅकर अॅप
अंगणवाडी सेविका पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण ट्रॅकर हे अॅप गरोदर, स्तनपान करणाऱ्या महिलांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेचा ऑनलाइन रेकॉर्ड ठेवण्यासाठी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले आहे.
6 ग्रामीण भागातील ग्राम बालविकास केंद्रात कुपोषित मुलांना विशेष पूरक आहार दिला जातो. पण, शहरामध्ये नागरी बालविकास केंद्र नाही. शहरी भागात त्याची ऑर्डर देण्यात आली आहे. लवकरच शहरातही सुरू होईल. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होईल. या केंद्रामध्ये जी कुपोषित मुले आहेत, त्यांना डॉक्टरांच्या आणि इतर आहारतज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते. त्यांना दररोज विशेष पूरक आहार देण्यात येतो आणि वजन वाढते की नाही, याची तपासणी केली जाते.
– सुरेश टेळे, बालविकास प्रकल्प अधिकारी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List