मालेगाव बाम्बस्फोट खटला विशेष न्यायाधीशाची बदली
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बाम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या 17 वर्षांत हे पाचवे विशेष न्यायाधीश आहेत, ज्यांची बदली करण्यात आली आहे.
उच्च न्यायालय प्रशासनाने हे बदली आदेश जारी केले आहेत. विशेष न्यायाधीश लाहोटी यांची नाशिक जिल्हा न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशानुसार 9 जून 2025 रोजी विशेष न्यायाधीश लाहोटी बदली झालेल्या ठिकाणी रुजू होतील.
महत्त्वाचे म्हणजे सरकारी व बचाव पक्षाला आपला युक्तिवाद 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यास विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी सांगितले आहे. त्यानंतर ते यावरील निकाल राखून ठेवतील, असे अपेक्षित होते. मात्र या बदलीमुळे खटला रेंगाळण्याची भीती पीडितांचे वकिल शाहिद नदिम यांनी व्यक्त केली आहे. विशेष न्यायाधीश लाहोटी यांना मुदतवाढ द्यावी, अशी विनंती उच्च न्यायालयाला करणार असल्याचे अॅड. नदिम यांनी सांगितले.
प्रकरणे निकाली काढा
साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण झालेल्या खटल्यांचे निकाल जाहिर करुन टाका. प्रलंबित खटले बदली होण्याआधी निकाली काढा, असे बदली झालेल्या न्यायाधीशांना सांगण्यात आले आहे. तसे त्यांच्या बदली आदेशात नमूद आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग आरोपी
भाजपची माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित. निवृत्त मेजर रमेश उपाध्यायसह अन्य आरोपींविरोधात हा खटला सुरू आहे. हा खटला लवकरात लवकर निकाली निघावा, अशी मागणी बॉम्बस्फोटातील पीडितांकडून केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List