कोट्यवधींची थकीत बिले तातडीने द्या, नाहीतर राज्यभर आंदोलन; शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा सरकारला इशारा
राज्यातील विविध रुग्णालयांची महात्मा फुले आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेची सुमारे 270 कोटी रुपयांची बिले थकलेली आहेत तर 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त कोटींची बिले ही आता अंडर प्रोसेसिंग आहेत. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ही अत्यंत गंभीर घटना असून गोरगरीबांवरील उपचार थांबले आहेत. त्यामुळे कोट्यवधींची थकीत बिले तातडीने द्या, नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिला आहे.
शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, जिल्हा समन्वयक विकी मोहिते, जिल्हा सहसचिव गोविंद वाघमारे, जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील, अमित पै, रितेश पाटील, अभिजीत बुकशेट, सागर कुंभार, आकाश खाडे या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यावेळी हा इशारा देण्यात आला. दरम्यान, लवकरच बैठक घेऊन रुग्णालयांची रखडलेली बिले देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल तसेच या दोन्ही योजना बंद पडणार नाही, अशी हमी आरोग्यमंत्र्यांनी दिली.
महायुतीने आर्थिक नियोजन केले नाही
विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुतीने घाईघाईने लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना सुरू करताना कोणतेही आर्थिक नियोजन केले नाही. त्याचाच परिणाम आज विविध योजनांवर व विकासकामांवर होत आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य योजना सुरू आहेत, पण या योजनांची कोट्यवधींची बिले थकलेली असल्यामुळे केव्हाही या योजना बंद पडतील, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा!
शिष्टमंडळाने थकबाकी देण्याबरोबर इतर काही मागण्या केल्या आहेत. यात सलग्न रुग्णालयाची देय रक्कम त्वरित द्यावी, या योजनेअंतर्गत सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर तातडीने कारवाई करावी, दोन्ही योजनेतील सेवा न देणाऱ्या रुग्णालयांच्या विरुद्ध सक्षम तक्रार कक्ष उभा करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List