मुंबईकरांच्या पैशांची महायुती सरकारकडून धूळधाण,आणखी 16 हजार 900 कोटींच्या मुदत ठेवींवर डल्ला
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असून तिजोरीत पैसे नसतानाही अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची विकासकामे जाहीर केल्यानंतर आता ती पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवींमधून 16 हजार 900 कोटींचे अंतर्गत कर्ज घेण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर ओढवली आहे. मुंबई महापालिकेने 2024-25 सालासाठी पाठवलेला अंतर्गत कर्ज प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजूर केला आहे. हे कर्ज 20 वर्षांसाठी प्रतिवर्षी 9 टक्के दराने टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये अर्थसंकल्प ‘अ’, ‘ब’ आणि ‘ई’च्या बाबतीत सन 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 26 हजार 880.56 कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी विशेष प्रकल्पाकरिता प्राप्त होणारे अनुदान, विशेष निधीतील अंशदान, महसुली लेख्यातील अंशदान व इतर भांडवली प्राप्ती अशा प्रकारे एकूण 15 हजार 359.78 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे 2024-25 या आर्थिक वर्षात अपेक्षित असलेला 26 हजार 880.56 कोटी रुपयांचा भांडवली खर्च भागवण्यासाठी 16 हजार 900 कोटींचा निधी कमी पडणार आहे. हा निधी अंतर्गत कर्जातून उभा केला जाणार आहे.
महापालिका काय म्हणते…
महापालिकेच्याच अंतर्गत निधीतून कर्ज उभारणी केल्यास हे कर्ज उभारणीकरिता अथवा कर्ज परतफेडीकरिता महापालिकेला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त प्रशासकीय खर्च करावा लागत नाही. मात्र हे कर्ज बाह्य संस्थेकडून घेतल्यास त्यासाठी येणारा रेटिंग चार्जेस, अरेंजर्स कॉस्ट, स्टॅम्प डय़ुटी, लीड अरेंजर्स फी यासह विविध बाबींसाठी कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त सुमारे 3 ते 4 टक्के इतका अतिरिक्त खर्च येतो. त्यामुळे भांडवली कामांचा खर्च भागवण्याकरिता अंतर्गत निधीतून कर्ज उभारणी करणे सोयीस्कर ठरते, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
शिवसेनेच्या काळात मुदत ठेवी वाढल्या
20 वर्षांपूर्वी तोटय़ात असणारी मुंबई महापालिका शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये मोठी वाढ झाली. शिवसेनेच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात पालिका फायद्यात येऊन मुदत ठेवी तब्बल 92 हजार कोटींवर गेल्या होत्या. मात्र ‘मिंधे’ सरकारच्या कार्यकाळात ठेवी झपाटय़ाने घटल्या.
असे कोणतेही कर्ज नाही आणि मुंबई महापालिकेला कर्ज घेण्याची गरजही नाही. हे केवळ बजेट अंतर्गत लेखा समायोजन असते. – भूषण गगराणी, महापालिका आयुक्त
अंतर्गत कर्ज म्हणजे काय…
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चात अंतर्गत कर्जाचा समावेश करण्यात येतो. अंतर्गत कर्ज हे महापालिकेच्या मुदत ठेवींमधून घेतले जाते. मात्र आतापर्यंत ते घेण्याची गरजच पडली नव्हती. याआधी 2002-03 साली महापालिकेने अंतर्गत कर्ज घेतले होते. मात्र आता पुन्हा 23 वर्षांनी मुंबई महापालिकेने अंतर्गत कर्जातून निधी उचलण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. दरम्यान, याअंतर्गत कर्जाची शिफारस मुंबई महापालिकेचे तत्कालीन महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनीच 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती.
– मुंबई महापालिकेचे सर्वात मोठे उत्पन्न स्रोत असलेला जकात कर रद्द झाल्यापासून पालिकेचा आता केवळ मालमत्ता कर हाच मोठय़ा उत्पन्नाच्या स्रोत राहिला आहे. त्याचबरोबर कचरा कर, झोपडपट्टय़ांमधील लहान व्यावसायिक यांच्यावरही मालमत्ता कर लावण्यात येत आहे. मात्र तिजोरीत पैसे नसताना न परवडणारे कोटय़वधी किमतीचे प्रकल्प जाहीर करून नंतर हीच कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या मुदत ठेवी मोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावला आहे.
ठेवी अशा झाल्या कमी
मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये तब्बल 92 हजार कोटींच्या मुदत ठेवी जमा होत्या. मात्र गेल्या अडीच वर्षांत महापालिकेने तब्बल 11 हजार कोटींच्या मुदत ठेवी मोडीत काढल्या आहेत. आता बँकांत 81 हजार 774 कोटींच्या ठेवी जमा आहेत. त्यापैकी आता 16 हजार 900 कोटींच्या मुदत ठेवी अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून मोडल्या जाणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List