अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांनाही मालमत्तेत हक्क, हायकोर्टाचा निर्वाळा
पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे कायद्याला मान्य नाही. हा दुसरा विवाह कायदेशीर मानला जात नाही. असे असले तरी दुसऱ्या अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आहे, असा निर्वाळा ओडिशा उच्च न्यायालयाने दिला आहे. मालमत्ता हक्कावरून कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
हिंदू विवाह कायदा आणि हिंदू उत्तराधिकारी कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने न्यायमूर्ती बी. पी. राउतराय आणि न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. दुसरा विवाह अवैध घोषित केला असला तरी त्या अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांना पित्याच्या मालमत्तेत संपूर्ण हक्क असेल. केवळ पित्याने स्वतः कमावलेल्या मालमत्तेत नव्हे, तर वडिलोपार्जित मालमत्तेतही हक्क असेल, असे खंडपीठाने म्हटले आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेने दिवंगत पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना वडिलोपार्जित मालमत्तेपासून दूर ठेवण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलांचाही पित्याच्या मालमत्तेत हक्क असल्याचे स्पष्ट करीत वृद्धेची याचिका फेटाळून लावली.
1956 च्या हिंदू विवाह कायद्याच्या कलम 16 मधील तरतुदीनुसार अवैध विवाहांतून जन्मलेल्या मुलांनाही कायदेशीर वैधता देण्यात आली आहे. ही मुलेदेखील हिंदू वारसाहक्क कायद्यांतर्गत वारसांच्या प्रथम श्रेणीत मोडतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List