महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थान तापला; 21 शहरांमध्ये तापमान 41 अंशांवर पोहचले
महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थानात उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. हवामान खात्याने रविवारी उत्तरेकडील राज्यांना तापमानवाढीचा अलर्ट दिला होता. तसेच काही राज्यात तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे उत्तर हिंदुस्थान तापमानवाढीने होरपळला आहे. उत्तर हिंदुस्थानातील 21 शहरांमध्ये तापमान 41 अंशांच्यावर पोहचले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात तापमानवाढ झाल्याचे दिसून आले. या आठवड्यात तापमानवाढ कायम राहणार असून राजधानी दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशात तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्रतवली आहे.
उत्तरेकडील पाच राज्यांमधील 21 शहरांमध्ये रविवारी तापमान 42 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमान नोंदवले गेले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीव्यतिरिक्त राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हवामानातील बदलामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात सरासरी तापमानात सुमारे तीन अंशांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या तापमानवाढीमुळे उत्तर हिंदुस्थानात काही भागात उष्ण वाऱ्यांचा झोत वाढणार आहे. या वाऱ्याचा वेग 8-10 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या बारमेरमध्ये उष्णतेने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. रविवारी कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस होते. हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे.
हवामान खात्याने सांगितले की 6-10 एप्रिल दरम्यान गुजरातमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर सौराष्ट्र आणि कच्छमधील काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याच काळात राजस्थानमध्येही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात तापमानवाढ होणार आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तापमानात मोठी वाढ अपेक्षित असल्याने उष्णतेपासून बचावासाठी जनतेने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List