‘ताप’ वाढला, मुंबईकरांचा घामटा निघाला, पुढील चार दिवस तीव्र उष्म्याचे
अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढली आहे. रविवारी मुंबईचे तापमान अचानक 36 अंशांवर गेले. शहरात पुढील चार दिवस तीव्र उष्मा असेल. कमाल तापमान 37 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
दोन महिने तापमानात चढउतार सुरू राहिल्यानंतर गेल्या आठवडय़ात राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडला. त्या पावसाने काही काळ वातावरणात गारवा निर्माण केला, मात्र त्यानंतर पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचा अलर्ट जारी केला आहे. रविवारी मुंबई शहर व उपनगरांतील तापमानात मोठी वाढ झाली. सांताक्रुझमध्ये 36 अंश कमाल तापमान नोंद झाले, तर किमान तापमान 26 अंशांवर गेले. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने सुट्टीत घराबाहेर फिरताना मुंबईकरांचा प्रचंड घामटा निघाला.
पुढील 48 तास विशेष खबरदारीचे!
पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान 40 अंशांच्याच पुढे राहील. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे, नाशिक व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश तापमान
उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक आहे. बहुतांश जिल्ह्यांचा पारा 40 ते 42 अंशांवर गेल्याने नागरिकांना असह्य वाटू लागले आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पारा 40 अंशांच्या घरात गेला आहे. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश कमाल तापमान नोंद झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List