चित्रपटांच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेची 40 लाखांची कमाई, निर्मात्यांची सीएसएमटी, आपटा स्थानकाला सर्वाधिक पसंती
मध्य रेल्वेने 2024-25 या सरत्या आर्थिक वर्षात चित्रपटांच्या चित्रीकरणातून चांगलीच कमाई केली असून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 40.13 लाख रुपयांची भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि आपटा स्थानकाला चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती मिळाली असून पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारासारखी स्थानके तसेच तुर्भे व वाडीबंदर रेल्वे यार्ड ही ठिकाणेही हॉटस्पॉट ठरली आहेत.
मध्य रेल्वेने 2024-25 या आर्थिक वर्षात चित्रपटाच्या चित्रीकरणांसाठी विविध परिसर आणि रेल्वे कोच देऊन 40.13 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. विविध ठिकाणी चित्रपट निर्माते आणि धर्मा प्रोडक्शन्ससारख्या आघाडीच्या निर्मिती संस्थांनी 3 नेटफ्लिक्स चित्रपट, 2 वेब सीरिज, 1 प्रादेशिक चित्रपट आणि 1 जाहिरात चित्रपट असे सुमारे 7 चित्रीकरण केले. कथा पिक्चर्स प्रोडक्शनच्या ‘गांधारी’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून सर्वाधिक 17.85 लाख रुपये मिळाले, तर धर्मा प्रोडक्शनच्या ‘आप जैसा कोई’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून 8.12 लाख रुपये मिळाले. हे दोन्ही चित्रपट आपटा स्थानकावर चित्रीत झाले. हे स्थानक पूर्वी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मुन्ना मायकल’ यांसारख्या प्रतिष्ठत चित्रपटांसाठीचे पहिल्या पसंतीचे ठिकाण होते. नैसर्गिक सौंदर्यामुळे आपटा स्थानक सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे एकूण 3 चित्रीकरणे झाली असून त्यातून एकूण 27.57 लाख रुपये उत्पन्न मिळाले, जे चित्रीकरणातून झालेल्या एकूण उत्पन्नाच्या 68 टक्के आहे.
चित्रित झालेले चित्रपट व ठिकाणे
सीएसएमटी येथे नेटफ्लिक्स सीरीज ‘खाकी’ आणि ‘टी-20 विश्वचषक जाहिरात’ कॉटन ग्रीन स्थानक तेलगू चित्रपट ‘कुबेर’ आपटा येथे ‘चिल्ड्रन ऑफ फ्रीडम’ वेब सीरिज माटुंगा येथे ‘दल दल’ वेब सीरिज.
मध्य रेल्वेवर यापूर्वी ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘कमिने’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘रा-वन, रावन’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दबंग’, ‘दरबार’, ‘रंग दे बसंती’, ‘पेहंकी’, ‘बांइग’ यांसारखे हिट चित्रपट शूट झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून चित्रपट चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही परवानगी जलद मिळावी यासाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ सुरू केली आहे. त्यामुळे चित्रपट कंपन्यांना अर्जासोबत पटकथा व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर परवानगी मिळण्यास मदत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List