जातनिहाय सेल बंद करा, नितीन गडकरी यांचा भाजप नेत्यांना सल्ला
देशातील सर्वाधिक मोठा पक्ष झालेल्या भाजपला आता कोणाकोणाला तिकीट द्यायचे, असा प्रश्न पडू लागला आहे. जातनिहाय सेल उघडल्याने यात आणखीन अडचणी वाढू लागल्या आहेत. महापालिकेचा एका जागेसाठी 50-50 इच्छुक दावे करत आहेत. जातीनुसार कोटा मागितला जात आहे. यामुळे भविष्यात मोठी समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे जातनिहाय सेल बंद करा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथील भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, मीसुद्धा हीच चूक सुरुवातीला केली होती. ती सुधारली. आता तुम्हीसुद्धा यापासून बोध घ्या, असा सल्ला देऊन त्यांनी भाजपचा कार्यकर्ता हीच सर्वोच्च ओळख असावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तिकीट कापलं तरी अन्यायाचे अस्त्र उगारतात
सर्व समाजाला जोडण्यासाठी भाजपने आजवर अनेक प्रयोग केले आहेत. सर्वाना सामावून घेतले आहे. विविध आघाड्या स्थापन केल्या आहेत. जातनिहाय सेल उघडले. आता पक्ष मोठा झाला असून सत्तेत आला आहे. मोठा जनाधार निर्माण झाला. त्यामुळे निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. प्रत्येक आघाड्या आणि सेलमार्फत तिकिटांची मागणी होऊ लागली आहे. अलीकडे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला आहे. जातीय अस्मिता बळावू लागल्या आहेत. एखाद्याचे तिकीट कापले तरी अन्यायाचे अस्त्र उगारले जात आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असल्याने याच पक्षाला त्याची सर्वाधिक झळ बसत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List