रामनवमीला काळाराम मंदिरात शासकीय महापूजा व्हावी; शिवसेनेची मागणी
महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक संघर्षात काळाराम मंदिराचे योगदान मोठे आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पांडुरंगाची जशी शासकीय महापूजा होते, तशीच महापूजा काळाराम मंदिरात श्रीरामनवमीला व्हायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आले पाहिजे, अशी भावना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे व्यक्त केली.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी रविवारी श्रीरामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन रामरायाचे मनोभावे दर्शन घेतले. काळाराम संस्थानच्या वतीने महंत सुधीरदास महाराज व विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अयोध्येनंतर काळाराम मंदिर हे माझ्यासाठी श्रद्धेचे स्थान आहे. येथेच मी जास्त वेळा दर्शन घेतले आहे. हा बहुजनांचा देव असल्याने अधिक प्रिय आहे. काही लोकांनी बंद केलेले येथील दरवाजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी बहुजनांसाठी उघडले. या मंदिराचे देशातील सामाजिक संघर्ष व चळवळीत खूप मोठे योगदान आहे, हे पुरोगामी महाराष्ट्राचे मंदिर आहे. त्यामुळे येथे श्रीरामनवमीला शासकीय महापूजा व्हायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आले पाहिजे, असे मत मांडले.
या वेळी उपनेते सुनील बागुल, अद्वय हिरे, सुधाकर बडगुजर, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, गुलाब भोये, भगवान भोगे, राहुल दराडे, सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. श्रीरामनवमीनिमित्त रविवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात प्रभू रामरायाचे दर्शन घेतले. महंत सुधीरदास महाराज यांच्यासह विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.
फडणवीस 20 वर्षांत का आले नाहीत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारच तीर्थयात्रा करतात, पण गेल्या 20-25 वर्षांत ते काळाराम मंदिरात का आले नाहीत? असा कायम प्रश्न पडतो. हा बहुजनांचा देव आहे, त्याच्याविषयी त्यांच्या मनात अढी असू नये, असे खासदार संजय राऊत या वेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List