संस्कृती-बिंस्कृती- धर्माची कुंपणं हवीत कशाला?
>> डॉ. मुकुंद कुळे
दक्षिणेत मंदिरं आणि कला परंपरांचं अतूट नातं आहे. दक्षिणेकडील अनेक नृत्यांगनांना स्वतःलाही मंदिरात देवासमोर एकदा तरी नृत्य केल्याशिवाय आपल्या कलेला पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही. कारण बहुतांशी नृत्यशैली या देवाच्या करावयाच्या मनोरंजनातूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे देवासमोर नृत्य करायला मिळणं, हा आजही त्यांना आपल्या कलेचा गौरव वाटतो. मानसिया व्ही. पी. या भरतनाटय़म नृत्यांगनेला केरळमधील कुडलमाणिक्यम मंदिराच्या वार्षिकोत्सवात नृत्य करायचं होतं, पण तिचा धर्म तिच्या आड आला. नव्हे, मंदिराच्या पुजारी आणि व्यवस्थापनाने तिचा धर्म आड आणला. कलेपेक्षा कलाकाराचा धर्म इथे महत्त्वाचा ठरला.
किती साधी आणि सुंदर गोष्ट आहे की, एका मित्राने आपल्या दुसऱया मित्राच्या आरोग्यासाठी पूजा केली. यात त्यांच्या धर्माचा प्रश्न येतो कुठे? ‘मला वाटलं मी पूजा केली. मी हिंदू असल्यामुळे मी मंदिरात जाऊन पूजा केली. उद्या माझ्या मुस्लीम मित्राला वाटलं, तर तो मशिदीत जाऊन माझ्या सुखासाठी नमाज अदा करेल…’
मग यात एकमेकांच्या धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा प्रश्न आलाच कुठे? दोन मित्रांना मनापासून वाटलं तर ते हे करूच शकतात… कारण तो त्यांचा मैत्री-धर्म आहे. मग ते हिंदू, मुस्लीम किंवा अन्य धर्मीय का असेनात. उलट ते कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांच्या या कृतीने एकप्रकारे मानवता धर्माचीच नाही का जपणूक होत?
पण नाही, आपापला धर्म कवटाळून बसलेल्या प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो आणि मग तो आपल्याच धर्माच्या चौकटीतून इतरांच्या धर्माची निरखणं-परखणं करतो… सगळ्या धर्मांत आपलाच धर्म श्रेष्ठ असल्याचे ढोल बडवत बसतो. वस्तुत जगातला कोणताही धर्म घेतला तर त्याच्या मुळाशी जगाचं कल्याणच चिंतलेलं आहे. पण धर्माच्या ठेकेदारांना हे मान्य नसतं आणि म्हणून तर मग प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल याने आपला प्रिय मित्र असलेल्या मामुट्टीच्या आरोग्यासाठी शबरीमला मंदिरात केलेली उषापूजाही (पहाटेची पूजा) वादात सापडते. कारण काय तर म्हणे- मामुट्टी हा मुस्लीम आहे आणि त्यामुळे त्याचा धर्म इतर धर्माच्या देवांची पूजा करण्याची परवानगी देत नाही. गंमत म्हणजे अशा वेळी दोन्हीकडच्या धर्माच्या ठेकेदारांची मतं अगदी एकसारखीच असतात.
खरं तर दाक्षिणात्य (प्रामुख्याने मल्याळम) सिनेइंडस्ट्रीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असतानाही मोहनलाल आणि मामुट्टी यांची गेली कित्येक वर्षं घनिष्ट मैत्री आहे. ही मैत्री त्यांनी आपापल्या धर्माच्या पलीकडे जाऊन जपलेली आहे. आजवर ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही कारणाने का होईना, मोहनलाल यांना स्वतहून आपल्या मित्राच्या नावाने शबरीमला मंदिरात पूजा करावीशी वाटली असेल तर त्यात बिघडलं कुठे? किंवा अगदी मामुट्टी यांनीच त्याला पूजा करायला सांगितली असेल तर त्यातही गैर काय आहे? प्रत्येक धर्माने आपापला देव मानला आहे आणि धर्मपरत्वे प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे, तरी देव एक असो वा अनेक, तो आकाशीचा बापच आहे ना आणि त्याच्यासाठी पृथ्वीवरील सारी लेकरं सारखीच आहेत ना… मग एकमेकांचं भलं चिंतताना किंवा अगदी कलेची साधना करताना धर्माची कुंपणं हवीतच कशाला?
आता हिंदू असलेल्या मोहनलाल यांनी आपला मित्र असलेल्या मुस्लीम मामुट्टी यांच्यासाठी केलेली पूजा वादग्रस्त ठरली. तर अगदी अलीकडेच 2022 मध्ये एका मुस्लीम नर्तकीने मंदिरात नृत्य केलं म्हणून मोठा वादंग माजला होता. मानसिया व्ही. पी. ही केरळमधली एक नावाजलेली भरतनाटय़म नर्तकी. एक प्रयोगशील नर्तकी म्हणून ती ओळखली जाते. विशेषतः सुफी संगीत आणि भरतनाटय़मचा अपूर्व मिलाफ साधून ती घडवत असलेल्या नृत्याविष्काराला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. दोनेक वर्षांपूर्वी जेव्हा केरळच्या त्रिसूरमधील कुडलमाणिक्यम मंदिराने तिला मंदिराच्या वार्षिक महोत्सवात होणाऱया नृत्यविषयक कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, तेव्हा साहजिकच ती आनंदून गेली, मात्र… तिच्या प्रत्यक्ष सादरीकरणाआधी मंदिरातील पुजारी आणि व्यवस्थापनाने फतवा काढला की, मानसियाला कुडलमाणिक्यम मंदिरात इतर नृत्यांगनांप्रमाणे नृत्य करता येणार नाही. कारण मानसिया व्ही. पी. ही धर्माने मुस्लीम आहे.
मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय मानसियाला कळवला, तेव्हा साहजिकच तिला वाईट वाटलं. परंतु हा अनुभव तिच्यासाठी नवीन नव्हता. यापूर्वीही केरळमधील एका मंदिराने, केवळ ती मुस्लीम असल्यामुळे तिला मंदिरात नृत्य करायला विरोध केला होता. मात्र तेव्हा ती शांत बसली. त्या अनुभवाची तिने कुठेच वाच्यता केली नाही. कारण शंभर टक्के साक्षरता असलेल्या केरळमध्ये हा अनुभव अपवादात्मक असेल असा तिचा होरा होता. पण तिचा अंदाज कुडलमाणिक्यम मंदिराने खोटा ठरवला आणि तिचे डोळे खाडकन् उघडले… आणि याच जाणिवेतून तिने मग या अन्यायाविरोधात आवाज उठवला. विशेष म्हणजे कुडलमाणिक्यम मंदिरात नृत्य सादर करण्याची संधी मिळालेल्या इतर काही नृत्यांगनांनीही तेव्हा मंदिर व्यवस्थापन समितीच्या या कृतीचा निषेध म्हणून वार्षिकोत्सवात नृत्य सादर न करण्याचा निर्णय घेतला. त्या ठामपणे मानसियाच्या मागे उभ्या राहिल्या.
बघायला गेलं तर मंदिरात नृत्य केलं काय किंवा न केलं काय, त्याने मानसियाच्या करिअरमध्ये किंवा प्रतिष्ठेमध्ये फार मोठा फरक पडणार नव्हताच. पण मंदिरात देवाच्या उत्सवात नृत्य सादर करण्याची संधी मिळणं, हा दक्षिणेकडील नृत्य कलावंताना आजही आपला मोठा सन्मान वाटतो.
वास्तविक मंदिरातील कला परंपरा म्हणजे देवदासींची कला परंपरा. देवाच्या मनोरंजनासाठी देवदासी जे नृत्य गायन करायच्या, तेच या कला परंपरेचं मूळ. पूर्वी केवळ दक्षिणेकडीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील मंदिरांच्या दैनंदिन विधीविधानांत आणि वार्षिकोत्सवात देवदासींचं नृत्य-गायन व्हायचं. देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी आणल्यानंतर मंदिरातील देवदासींच्या नृत्य-गायनाची प्रथा बंद पडली. मात्र कायद्याने बंदी आली, तरी ही देवदासी प्रथा आणि किमान वार्षिकोत्सवातलं त्यांचं देवासमोरचं नाचगाणं मंदिर व्यवस्थापनाच्या मनातून काही गेलं नाही. वर्षातून एकदा देव मंदिराबाहेर पडणार, म्हणजे रिवाज म्हणून त्याच्या आगतस्वागतासाठी नृत्य हवंच आणि याच अट्टहासातून त्यांनी लपूनछपून वार्षिकोत्सवातील नाचगाणं कायम ठेवलं. आपली परंपराच असल्यामुळे आणि देवावर श्रद्धा असल्यामुळेही जोपर्यंत परंपरागत देवदासी होत्या, त्या वार्षिकोत्सवात देवासमोर नृत्य सादर करायच्या. परंतु कालौघात सगळ्याजणी मृत्यू पावल्यानंतर हळूहळू भारतातील बहुतेक मंदिरांतील ही नृत्य परंपरा कायमची बंद झाली. पण दक्षिणेकडे मात्र आजही विविध उत्सवांच्या निमित्ताने मंदिर किंवा मंदिर परिसरात नृत्याच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. कारण पुन्हा तेच, दक्षिणेत मंदिरं आणि कला परंपरांचं असलेलं अतूट नातं. देवदासी सादर करीत असलेल्या कला या मंदिरातील धार्मिक-सांस्कृतिक उपचारांचं एक अभिन्न अंग होत्या. त्यामुळेच एकप्रकारे तो सांस्कृतिक धागा सांभाळून ठेवण्याचा या मंदिरांचा प्रयत्न आजही असतो. अर्थात आज त्या वार्षिकोत्सवांत नृत्य सादर करणाऱया नृत्यांगना या व्यावसायिक कलावंत असतात. त्यांचा देवदासी परंपरेशी काहीही संबंध नसतो. त्या केवळ कला म्हणून देवासमोर नृत्य सादर करतात. महत्त्वाचं म्हणजे दक्षिणेकडील अनेक नृत्यांगनांना स्वतःलाही मंदिरात देवासमोर एकदा तरी नृत्य केल्याशिवाय आपल्या कलेला पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही. कारण बहुतांशी नृत्यशैली या देवाच्या करावयाच्या मनोरंजनातूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे देवासमोर नृत्य करायला मिळणं, हा आजही त्यांना आपल्या कलेचा गौरव वाटतो. मानसिया व्ही. पी. हिलादेखील म्हणूनच वार्षिकोत्सवात नृत्य करायचं होतं, पण तिचा धर्म तिच्या आड आला. नव्हे, कुडलमाणिक्यम मंदिराच्या पुजारी आणि व्यवस्थापनाने तिचा धर्म आड आणला. वस्तुतः एक मुस्लीम मुलगी आपलं भरतनाटय़म शिकून त्यात प्रावीण्य मिळवते, याचा मंदिर व्यवस्थापनाला आनंद व्हायला हवा होता आणि त्यांनी तिला प्रोत्साहन द्यायला हवं होतं. प्रत्यक्षात मात्र त्यांनी मानसियाला नाउमेद केलं. हिंदूंच्या मंदिरात एका मुस्लीम नृत्यांगनेचा नाच म्हणजे त्यांच्या दृष्टीने तोबा तोबा…
पण मोहनलाल यांच्याबाबतीत जे घडलं ते काय किंवा मानसिया यांच्या बाबतीत जे घडलं ते काय… मंदिर असो वा मशीद, रूढीवादी नांगी ठेचायला हवी. कारण केरळमध्ये कुडलमाणिक्यम मंदिराच्या व्यवस्थापनाने मानसियाच्या केवळ मंदिरातील नृत्यालाच विरोध केला होता. कर्नाटकमधील रूढीवाद्यांनी तर मंदिरांच्या जत्रेत आणि मंदिर परिसरात मुस्लीम बांधवांकडून लावल्या जाणाऱया दुकानांवरच बंदी आणण्याची मागणी केली होती. म्हणजे, यांचं डोकं ठिकाणावर आहे काय? असंच म्हणायची वेळ आली आहे.
…तेव्हा कुणी तरी यांना आपल्या म्हसोबाच्या जत्रेत नाहीतर एखाद्या पिराच्या उरुसात फिरवून आणलं पाहिजे, त्याशिवाय हिंदू-मुस्लीम एकमेकांच्या सण-उत्सवात कसे रंगतात, ते यांना कळायचं नाही!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List