बंगळुरूने राजस्थानचा 9 विकेट्सने केला पराभव, टी 20 त कोहलीचे 100वे अर्धशतक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर 9 गड्यांनी पराभव केला आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 173 धावांचा डोंगर उभा केला, पण आरसीबीने विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर 18.1 षटकांतच हा सामना एकतर्फी जिंकला. यशस्वी जैस्वालच्या शानदार खेळीवर कोहली-पडिक्कल जोडी भारी पडली. या सामन्यात कोहलीने टी 20 त आपलं 100वं अर्धशतक ठोकलं आहे.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 173 धावा उभारल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने आक्रमक खेळी करत 47 चेंडूत 75 धावांचा डोंगर रचला. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. जैस्वालने जोस बटलरसह पहिल्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली. मात्र बटलर लवकर बाद झाल्याने दडपण वाढले. कर्णधार संजू सॅमसनने 32 धावांची खेळी केली, तर रियान परागने 28 धावांचे योगदान दिले. मधल्या षटकांत आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगली चपळाई दाखवली, ज्यामुळे राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शिमरॉन हेटमायर आणि नितीश राणा यांनी शेवटच्या षटकांत काही धावा जोडल्या, पण त्यांचा अपेक्षित प्रभाव पडला नाही.
174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 92 धावांची सलामी भागीदारी झाली. सॉल्टने फक्त 33 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली, यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. दुसरीकडे विराट कोहलीने 45 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. फिल साल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत 83 धावांची भागीदारी करून बंगळुरूला विजय मिळवून दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List