वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
>> मेघना साने
प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम 1952 सालापासून रेडिओ सिलोनवरून प्रसारित होत असे. श्रीलंकेतील या रेडिओ केंद्रावरून सादर होणारा हा कार्यक्रम पुढे भारतातील आकाशवाणीवरून प्रसारित होऊ लागला. मात्र रसिकांच्या मुखी या गीतमालेला रेडिओ सिलोनचे नाव चिकटले ते कायमचे. रेडिओ सिलोन आता श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन झाले असून हे रेडिओ केंद्र या वर्षी शतक महोत्सव साजरा करीत आहे.
आमच्या पर्यटन संस्थेने आमची श्रीलंकेची आयटेनररी आम्हाला पाठवली. त्यात कोलंबोमधील सिलोन रेडिओ स्टेशन दाखवण्याचा आम्ही आग्रह धरला. वास्तविक कोणी पर्यटकांनी प्रेक्षणीय स्थळांमध्ये हा पर्याय क्वचितच निवडला असेल. पण आमच्या विनंतीला मान देऊन पर्यटन संस्थेने आमच्या वतीने रेडिओ सिलोनची सकाळी साडेनऊची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली.
रेडिओ सिलोनला निघाल्यावर मनात कितीतरी आठवणी जाग्या होत होत्या. माझे आईवडील नेहमीच रेडिओवर सिलोन स्टेशन लावून हिंदी गाणी ऐकत असत. मोठमोठय़ा गीतकारांची, संगीतकारांची आणि गायकांची गाणी रेडिओ सिलोनवरून लहानपणीच माझ्या कानावर पडली होती. दर बुधवारी प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ तर आमचा आवडता कार्यक्रम होता. अमीन सयानी यांची निवेदनाची शैली अतिशय लोकप्रिय झाली होती.
कोलंबोमधील रेडिओ सिलोनसमोर आमची कार थांबली आणि कुतूहलाने मी गेटकडे वळले. बाहेरून एखाद्या बैठय़ा बंगल्यासारखी दिसणारी ही ब्रिटिशकालीन इमारत रेडिओ स्टेशनची असेल असे वाटतच नव्हते. बाहेरच बुद्धाची पांढरीशुभ्र मूर्ती स्थापन केली होती. फाटकातून आत शिरून मी रिसेप्शनमध्ये आले. तेथे तीस-पस्तीस वर्षांची रिसेप्शनिस्ट मुलगी बसली होती. श्रीलंकेत साधारणपणे सिंहली आणि तामीळ भाषा बोलली जाते. पण बहुतेक सुशिक्षित लोकांना इंग्रजीही येते. त्यामुळे मी तिच्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली.
मी भारतातून हे स्टेशन पाहायला आले आहे आणि आम्ही लहानपणापासून रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम आम्हाला कसा खूप आवडत होता, अमीन सयानी यांना बघितलेले नसतानाही त्यांच्या निवेदनाच्या प्रेमात कसे पडलो होतो वगैरे उत्साहात बोलायला सुरुवात केली. पण गंमत अशी की तिला ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रमदेखील माहीत नव्हता. अमीन सयानी यांचे नावही तिने ऐकले नव्हते. रेडिओ सिलोनमधे आलेल्या या अनुभवाने मी थोडीशी खट्टू झाले. पण मग लक्षात आले की, वयानेही खूप लहान आहे आणि ‘बिनाका गीतमाला’ हिच्या जन्माच्याही आधीचे असेल. तेवढय़ात आमच्या ड्रायव्हरने आतल्या ऑफिसमधे जाऊन ज्यांची अपॉइंटमेंट घेतली होती त्यांना आम्ही आल्याचे सांगितले. त्याप्रमाणे वेळेच्याही आधी तेथील इंग्रजी विभागाच्या ऑफिसर प्रियदर्शिनी सारा मॅडम यांनी सुहास्य वदनाने ‘आयुबोवान’ असे म्हणून आमचे स्वागत केले. आयुबोवान म्हणजे सिंहली भाषेत ‘नमस्कार!’ त्यांनी हिंदी विभागाच्या प्रमुख सुभाषिणी मॅडम यांच्याशी आमची ओळख करून दिली.
सुभाषिणी मॅडम यांना रेडिओ सिलोनवर कामाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. त्या तेथील चार लायब्ररींच्या प्रमुख आहेत. त्यांनी आम्हाला रेडिओ सिलोनच्या सर्व विभागांतून फिरवले आणि सारा इतिहास सांगितला. एका मोठ्या ऑडिटोरियममधे वाद्यवृंदाच्या लाईव्ह प्रसारणाची तयारी होत असताना पाहता आले. नंतर सुभाषिणी मॅडमकडून अधिक जाणून घेण्यासाठी ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या लायब्ररीत जरा विसावलो. या लायब्ररीत 26000 च्या वर हिंदी ग्रामोफोन रेकॉर्डस् आहेत.
सर्वप्रथम अत्यंत आनंदाची बातमी त्यांनी आम्हाला सांगितली. ती म्हणजे रेडिओ सिलोनला (म्हणजे आताच्या श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला) यंदा 2025 साली 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हे शंभरावे वर्ष सुरू आहे. मग त्यानिमित्त मी सुभाषिणी यांना रेडिओच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगण्याची विनंती केली.
रेडिओ सिलोन हे सिलोनवर ब्रिटिशांचे राज्य असताना 1925 साली ब्रॉडकास्टिंग स्टेशन म्हणून सुरू झाले. तसे प्रयोग म्हणून 1923 लाच येथून प्रसारण करून पाहिले होते. प्रयोग यशस्वी झाल्यावर 16 डिसेंबर 1925 पासून हे स्टेशन प्रसारणासाठी रीतसर सज्ज झाले. श्रीलंकेचे नाव तेव्हा सिलोन होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेच म्हणजे 1949 साली सिलोनलाही स्वातंत्र्य मिळाले. रेडिओ सिलोन हे कॉर्पोरेशनच्या अधिपत्याखाली आले व 1967 साली त्याचे नाव सिलोन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (CBC) झाले. आज या केंद्रातून सिंहली, तामीळ आणि इंग्रजी भाषेतून कार्यक्रम प्रसारित होतात. त्यावेळी या आकाशवाणीसाठी वेगळे मंत्रीपद नव्हते. सिलोन ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट हे पोस्टमास्तरांच्या अधिकार क्षेत्रात होते. आता 1972 सालापासून म्हणजे सिलोनचे नाव श्रीलंका झाल्यापासून हे रेडिओ केंद्र श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (SLBC) झाले.
मात्र या रेडिओवरून हिंदी भाषेतील प्रसारण कसे सुरू झाले त्याची एक कथा आहे. भारतात 1950 च्या सुमारास चित्रपट निर्मिती भरात आली होती. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याच्या गाण्यांची प्रसिद्धी करणे हे निर्मात्यांचे धोरण होते. कारण गाण्यांमुळे लोक चित्रपटाकडे आकृष्ट होत असत. पण तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री बी. व्ही. केसकर यांनी आकाशवाणीवरून सिनेसंगीत प्रसारित न करण्याचा नियम आणला होता. केवळ लोकगीते, भजने व अभिजात शास्त्राrय संगीत प्रसारित व्हावे व आपली संस्कृती टिकून राहावी अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे चित्रपट संगीताची गळचेपी होऊ लागली.
भारतातील या घडामोडींवर श्रीलंकेतील आकाशवाणीचे अधिकारीही लक्ष ठेवून होते. त्यांचे शॉर्टवेव्हमधील प्रसारण संपूर्ण हिंदुस्थानात ऐकू येत असे. त्यामुळे भारतातील चित्रपट क्षेत्रातील लोकांनी रेडिओ सिलोनकडे मोर्चा वळवला. सर्व ग्रामोफोन रेकॉर्डस् निर्माते रेडिओ सिलोनला त्यांच्या नव्या रेकॉर्डस् पाठवू लागले. रेडिओ सिलोनला गाण्यांच्या प्रसारणासाठी जाहिरातीही मिळू लागल्या. त्यावेळच्या मद्रासमधील एका जाहिरात कंपनीचे प्रमुख हरिहरन यांनी भारतातून जाहिराती मिळवून त्या सिलोनला पाठवायला सुरुवात केली. रेडिओ सिलोनवर जाहिरातींचा व्याप खूप वाढला. या विभागात काम करणाऱया माणसांना दिवसाचे तास कमी पडू लागले. प्रसारणात जागोजाग जाहिरातीचा स्पॉट लावावा लागे. त्यासाठी तज्ञ मंडळींचे एक वेगळे डिपार्टमेंटच उभारण्यात आले. या जाहिरात सेवेच्या बदल्यात श्रीलंकेला पैसे मिळत नसत. पण या सेवेच्या बदल्यात श्रीलंकेला अशोक लेलँडकडून मोफत बसेसचा पुरवठा होऊ लागला. अर्थात, भारतातील जाहिरातदार अशोक लेलँडला या बसेसचे पैसे देत असत. 1952 साली बिनाका टूथपेस्टच्या निर्मात्यांनी ‘बिनाका गीतमाला’ सुरू केली. त्यात हिंदी गाण्यांची लोकप्रियतेनुसार क्रमवारी ठरत असे. अमीन सयानींसारखे उत्तम निवेदक लाभल्यामुळे हा कार्यक्रम अधिकच लोकप्रिय होत होता. मात्र अमीन सयानी प्रत्यक्षात रेडिओ सिलोनला कधीच गेले नव्हते. कार्यक्रम मुंबईतच तयार होत असे व त्याचे रेकॉर्डेड स्पूल रेडिओ सिलोनला पाठवले जात असे.
इकडे भारतात आकाशवाणीवरून सिनेसंगीत वाजणे बंद झाल्यामुळे आकाशवाणीची लोकप्रियता कमालीची घसरली. तेव्हा भारत सरकारने सिनेसंगीतावरील बंदी उठवली. त्यामुळे श्रीलंकेतून शॉर्ट वेव्हवरून प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम बंद होऊन भारतातून मीडियम वेव्हवरून ‘सिबाका गीतमाला’ या नावाने प्रसारित होऊ लागला.
सुभाषिणी मॅडमनी सांगितले की, आता श्रीलंका ब्रॉडकास्टिंग स्टेशनवरून दोन मुख्य सेवा दिल्या जातात. एक राष्ट्रीय आणि दुसरी व्यावसायिक. दोन्ही सेवा या सिंहली, तामीळ व इंग्रजीत उपलब्ध आहेत. याशिवाय श्रीलंकेतील मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी या दृष्टीने शाळेतील शिशु ते माध्यमिक तसेच उच्च शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अनेक चांगले उपक्रम रेडिओवरून राबवले जात आहेत. तसेच ते इंटरनेट रेडिओवरही ऐकता येतात. रेडिओ सिलोन म्हणजेच आताचे श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही एक नॅशनल इन्स्टिटय़ूशनच झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List