शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनावर 1 एप्रिलला सुनावणी
शिवशंभूद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या त्याच्या जामिन अर्जावर 1 एप्रिल रोजी सुनावणीचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे कोरटकरची रवानगी थेट कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. या सुनावणीसाठी कोरटकरसह दोन्ही बाजुचे वकिलही न्यायालयासमोर ऑनलाईन उपस्थित होते.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना 24 फेब्रुवारी रोजी फोन करून नागपूरच्या प्रशांत कोरटकरने ठार मारण्याची धमकी दिली. तसेच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केले. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तो पळून गेला होता. त्याच्याविरोधात राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अखेर महिनाभराने कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणात त्याच्या मुसक्या आवळून येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्याला तीन दिवसांची आणि त्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
सुरवातीपासुन तो फोन आपण केलेला नाही, तो मी नव्हेच भुमिका कोरटकरने घेतली. त्याच्या मोबाईल मधील सर्व डाटा नष्ट करुन तो पोलिसांकडे जमा केला होता. त्याला पोलीस कोठडी मिळताच या काळात त्याचे आवाजाचे नमुने पोलिसांच्या फाॅरेन्सिंग विभागाकडून घेण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल येण्यापूर्वीच कोरटकरने तो फोन आपणच केल्याचे आणि तो आवाजही आपलाच असून फोनमधील सर्व डाटा आपणच नष्ट केल्याची कबुली दिली होती. पलायन केलेल्या काळात कुठे कुठे मुक्काम केला,कोणी कोणी मदत केली याची माहितीही त्याने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी पळुन जाताना कोरटकरने वापरलेली दोन आलिशान चारचाकी वाहने जप्त केली.
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की जामीन याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून न्यायालयात हजर करताना संतप्त शिवप्रेमी हातात कोल्हापूरी पायतान घेऊन त्याला कोल्हापूरचा हिसका दाखवण्यासाठी आक्रमक झाल्याने त्याला मागच्या दाराने न्यायालयात हजर करताना पोलिसांची दमछाक झाली होती. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही सुनावणीनंतर न्यायालयाच्या आवारातुन घेऊन जात असताना दोन वेळा कोरटकरला शिवप्रेमींच्या तडाख्यातून पोलिसांनी वाचवले.त्यामुळे सुरक्षेसाठी आज बारावे सह दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर ए.ए.व्यास यांच्यासमोर त्याला ऑनलाईन हजर ठेवण्यात आले.सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीव्दारे हजर करीत असल्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी न्यायालयास सांगितले.
कोरटकरचे वकील ॲड.सौरभ घाग यांनी व्हीसीव्दारे युक्तीवाद करत,कोरटकरला पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने,न्यायालयीन कोठडीची मिळावी अशी विनंती केली.त्यानंतर काही वेळातच जामीन अर्ज सादर केला.पण पोलीस, सरकारी वकील आणि मुळ फिर्यादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय जामीन अर्जावर असा तातडीने निर्णय घेता येणार नसल्याचे न्यायाधिशांनी सांगितले.सरकारी वकील सुर्यकांत पवार यांनी जामीनाला आक्षेप घेतला. त्यानंतर बचाव पक्षाचे ॲड. सौरभ घाग यांनी कोरटकर हे 25 वर्षे पत्रकारिता करीत आहेत. त्याच्याकडील तपास झाला आहे.सणासुदीचा काळ असल्याने जामीन दिला तर बरे होईल.तसेच कोरटकर वर कोल्हापूरात दोनवेळा हल्लयाचा प्रयत्न झाला आहे.कारागृहात त्याला एकत्र ठेवणे धोकादायक आहे, त्यामुळे स्वतंत्र ठेवण्यात यावे,अशी विनंती केली. न्यायाधिशांनी कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यामुळे पोलीसांनी त्याला कळंबा कारागृहात दाखल केले. आता पुन्हा 1 एप्रिल रोजी कोरटकरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.यावेळी न्यायालयात फिर्यादी इंद्रजित सावंत,त्याचे सहकारी हर्षल सुर्वे,दिलीप देसाई आदी उपस्थित होते.
कोरटकरने पलायनासाठी वापरलेल्या दोन कार जप्त
कोरटकरने विरोधात गुन्हा दाखल होताच,अटक होण्याच्या भितीने तो पळून गेला होता. या काळात त्याने दोन कार वापरल्या होत्या. त्यातील त्याची एक कार तर दुसरी कार धीरज चौधरी याची होती. या दोन्ही गाड्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. या वाहनांवर हल्ला होण्याची शक्यता ओळखून त्या सुरक्षीत ठिकाणी पोलीसांनी ठेवल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List