IPL 2025 – विजयाच्या मार्गावर परतण्यासाठी रस्सीखेच! बंगळुरू-राजस्थान आज जयपूरमध्ये भिडणार
मुंबई, चेन्नई, कोलकातासारख्या दिग्गज संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या संघाचे मनोबल उंचावले होते. मात्र, गुजरात आणि दिल्लीने आरसीबीच्या विजय रथाला ब्रेक लावला. त्यामुळे उद्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा विजय रथ पुन्हा रुळावर येतो का? याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे, तर दुसरीकडे पाच सामन्यांत केवळ दोन विजय मिळवणारा राजस्थान घरच्या मैदानावर आरसीबीला पराभवाचे पाणी पाजण्यासाठी सज्ज असणार आहे. त्यामुळे रविवार ‘ब्लॉक बस्टर संडे’ ठरणार आहे.
रविवारी दोन सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता जयपूर येथे राजस्थान आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे, तर दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता दिल्ली येथे मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणार आहे.
यंदा आरसीबीने दणक्यात सुरुवात करत सर्वांचे लक्ष वेधले. सध्या कोलकाता, मुंबई, चेन्नई यांना घरच्या मैदानात पराभूत करत सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, गुजरात आणि दिल्लीने आरसीबीचा पराभव करत विजयी मालिकेला ब्रेक लावला.
सध्या आरसीबी पाच सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी विराजमान आहे. आज राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या निश्चयाने आरसीबी मैदानात उतरणार आहे. फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार यांच्या प्रभावी फलंदाजीपुढे राजस्थानचे गोलंदाज कितपत तग धरतात हे पाहण्याजोगे असणार आहे.
राजस्थानच्या फलंदाजांना यंदाच्या मोसमात म्हणावे तसे यश प्राप्त करता आले नाही; तसेच गोलंदाजी हा देखील राजस्थान पुढचा सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. जोफ्रा आर्चर याला गेल्या दोन सामन्यांत चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दिग्गज फलंदाजांसमोर आर्चर प्रभावी मारा करतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजस्थान पाच सामन्यांत दोन विजयांसह सातव्या स्थानी आहे. राजस्थानचे फलंदाज यंदा प्रभावी छाप पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे आरसीबी विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना उत्तम फलंदाजी सादर करावीच लागेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List