वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा
>> तरंग वैद्य
‘मिसिंग’ची तक्रार, पोलिसांचा तपास असे पुढे जाणारे सरधोपट कथानक दूर सारत वेगळे काहीतरी दर्शवणारे हे ‘खोज – परछाईयों के उस पार’चे कथानक. खरं-खोटं सिद्ध करायच्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात पटकथाकार आणि दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.
पाचगणी महाराष्ट्रातील एक नयनरम्य ठिकाण. इथे एक जोडपं आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह मुंबईतून येऊन स्थायिक होतं. नवरा नामवंत वकील. त्यामुळे मोठय़ा बंगल्यात उंची राहणीमान. सुरुवात पोलीस स्टेशनपासून जिथे हा वकील त्याची बायको बेपत्ता आहे ही तक्रार नोंदवतो. एका ओळीत ‘खोज – परछाईयों के उस पार’ या पंचवीस मिनिटांचे सात भाग असलेल्या वेबसीरिजची कथा. ही वेबसीरिज झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 27 डिसेंबर 2024 पासून रुजू झाली आहे. अर्थातच ही तपासकथा आहे. ‘मिसिंग’ची तक्रार आणि मग पोलिसांचा तपास आणि पत्नी जिवंत मिळणार किंवा तिचे काही बरंवाईट झाल्याची बातमी येऊन कथा पुढे नेणार असा कयास बांधून आणि तीच सरधोपट कथा असं स्वीकारून आपण मालिका बघायला सुरुवात करतो.
सुरुवातीला नवरा-बायकोत भांडण झाले आणि ती नाराज होऊन निघून गेली असा अंदाज पोलीस अधिकारी त्याच्या अनुभवावरून बांधतो आणि या गृहस्थाला शांत करतो. जेव्हा दिवस उलटून जातो तेव्हा पोलीस कामाला लागतात आणि पहिल्या भागाच्या शेवटी इन्स्पेक्टर अमोल साठे बेपत्ता झालेल्या मीरा म्हणजेच वेद खन्नाच्या बायकोला त्याच्यासमोर उभं करतो. तुम्ही म्हणाल, पहिला भागच शेवटचा. नाही… इथे मोठा ‘ट्विस्ट’ आहे. वेद खन्ना त्या स्त्राrला आपली बायको मानण्यास सपशेल नकार देतो.
तपासकथा एक वेगळंच वळण घेते. मीरा इन्स्पेक्टरला सांगते की, झालेल्या भांडणामुळे वेद तिच्यावर नाराज आहे. इन्स्पेक्टरही घरगुती वाद समजून निघून जातो. पण वेद काही मानायला तयार होत नाही. ही माझी बायको नाही असं ठामपणे सांगतो आणि अमोल साठे हा खरं कोण आणि खोटं कोण या बुचकळ्यात पडतो. सत्य जाणून घेण्यासाठी तो मीराला ती वेदची बायको आहे हे सिद्ध करायला सांगतो. मीरा घरातील वस्तू कुठे असतात, वेदच्या आवडीनिवडी बरोब्बर सांगून इन्स्पेक्टरचा विश्वास जिंकते. पुढे वेदची मुलगी ही जेव्हा मीराला आई म्हणत बिलगते त्यानंतर संशयाला वावच उरत नाही.
इकडे काही केल्या वेद बधत नाही आणि वेळी अवेळी अमोलला फोन करून माझ्याविरुद्ध कट रचला जातोय, मला मदत करा ही विनवणी करत असतो. जेव्हा अमोल त्याला खरं समजून त्याला मदत करायला पुढे सरसावतो तेव्हा मीरा वेद मानसिक रोगी असून त्याचा रोग बळावल्यामुळे तो असा वागतोय याचा खुलासा करते. ती डॉक्टरचा पुरावा देते आणि रिपोर्टस्ही दाखवते. त्यामुळे इन्स्पेक्टर आपली पावले मागे घेतो.
खरं-खोटं सिद्ध करायच्या या खेळात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात पटकथाकार आणि दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. कलाकार मोजकेच चार असल्यामुळे प्रेक्षकांना धरून ठेवायची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि ती त्यांनी यशस्वी पद्धतीने पार पाडली आहे. शारीब हाश्मी अनेक वेबसीरिजमध्ये आला असून ओळखीचा चेहरा झाला आहे. अनुप्रिया गोयंका पण विविध वेबसीरिजमधून आपल्याला दिसत असते. दोघे चांगले कलाकार आहेत. कीर्ती गर्ग ठीक. लहान मुलगी पण गोड आहे. आतापर्यंत इन्स्पेक्टर आपण कडक आणि दमदार आवाज असलेला बघितला आहे आणि तसंच बघायची आपल्याला सवय झाली आहे. इथे आमिर दळवीने रंगवलेला पोलीस अधिकारी मृदू आवाज आणि काहीसा कवी स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याचं बोलणं काहीसं हळुवार आहे, पण हे वेगळेपण बघताना छान वाटतं.
कथा पाचगणीत घडते, पण पाचगणीचे सौंदर्य दाखवलं नाही, कारण कथेत त्याला वावच नाहीये. घर, पोलीस स्टेशन, हॉस्टेल आणि ठरावीक रस्ते दाखवत कथा संपते. शेवट सांगून मजा घालवणार नाही. त्यामुळे वेळ असल्यास ‘खोज – परछाईयों के उस पार’ ही वेबसीरिज झी फाईव्हवर बघा आणि सत्याची बाजू कोणाची हे जाणून घ्या.
[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List