खडवली वसतिगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार; मुलांना जबर मारहाण, संस्थेच्या संचालकांसह पाच जणांवर गुन्हा
खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका अनधिकृत वसतिगृहावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून 29 बालकांची सुटका केली आहे. या वसतिगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात होते, तर मुलांना अमानुषपणे मारहाण होत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने वसतिगृहावर छापा मारला. याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाईल्ड हेल्प लाईनवर खडवली येथील ‘पसायदान विकास संस्थे’बाबत तक्रार आली होती. तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या 29 बालकांची सुटका केली. यामध्ये 20 मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बालकल्याण समितीसमोर आणले. याप्रकरणी संस्थेचा संचालक बबन शिंदे, त्यांची पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, त्यांना मदत करणारा प्रकाश गुप्ता आणि दर्शना पंडित या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व खडवली येथील रहिवासी आहेत.
परीक्षेसाठी विशेष व्यवस्था
सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. त्यांची आगामी परीक्षा लक्षात घेता शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींच्या विशेष गृहात ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.
दोषींवर कठोर कारवाई करणार
बालकांची सुरक्षितता आणि त्यांचे हित हे प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. बालकांच्या शोषणाबाबत आमची भूमिका ‘झिरो टॉलरन्स’ची आहे आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. अशा गैरकृत्यांची तत्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जेणेकरून भविष्यात कोणीही बालकांच्या भविष्याशी खेळण्याचे धाडस करणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List