पाच कोटींच्या कर्जाचे आमिष; व्यावसायिकाची आत्महत्या, कमिशनपोटी 50 लाख लुटले; फायनान्सच्या व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा
व्यवसायवाढीसाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून कमिशनपोटी पन्नास लाख रुपये घेऊनही कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील व्यावसायिकाने मानसिक तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. ३० मार्च) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या खराडी शाखेचा व्यवस्थापक उपेंद्र यशवंत पाटील (रा. थेरगाव, पुणे), मच्छिंद्र पोपट झंजाड (रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि विशाल घाटगे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. विशाल घाटगे हा फरार झाला असून, पाटील व झंजाड यांना आज अटक करण्यात आली. त्यांना शिरूर न्यायालयाने शनिवार (ता. ५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संग्राम आबुराव सातव (वय – 46, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी जनाबाई संग्राम सातव यांनी फिर्याद दिली.
मृत सातव यांची रांजणगावातील लांडेवस्ती येथे जे. एम. एन. इंजिनीअरिंग प्रा. लि. नावाची रबर साहित्याची कंपनी असून, या कंपनीच्या वाढीसाठी व व्यवसायवृद्धीसाठी कर्ज हवे असल्याने इंडोस्टार फायनान्स कंपनीचा खराडी येथील व्यवस्थापक उपेंद्र पाटील यांनी सातव यांना भेटून पाच कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले आणि कमिशनपोटी त्यांच्याकडून चाळीस लाख रुपये घेतले.
विशाल घाटगे याने पन्नास लाख रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात पाच लाख रुपये कमिशन घेतले व झंजाड यानेही कर्ज करून देण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपये कमिशनची मागणी केली.
सातव यांनी स्वतःच्या राहत्या घरावर कर्ज काढून तसेच काही मित्रांकडून व ओळखीच्या लोकांकडून उसने पैसे घेऊन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. काही दिवस गेल्यानंतर कर्जमंजुरीबाबत सातव यांनी संपर्क साधला असता, पाटील, घाटगे व झंजाड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सातव यांनी वेळोवेळी संपर्क साधूनही तिघांनीही त्यांचे फोन न घेता, त्यांना भेटण्याचे टाळले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने सातव यांनी मानसिक तणावातून रविवारी (29मार्च) रात्री उशिरा कंपनीतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या गंभीर घटनेची दखल घेत रांजणगाव एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी पथकासह तपासाची चक्रे वेगाने फिरवून पाटील व झंजाड यांना अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List