यंदा उन्हाळ्यातही अभ्यासाला सुट्टी नाही! शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन अध्यापन करावे लागणार
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन अध्यापन करावे लागणार आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत 5 मार्च ते 30 जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता उन्हाळ्यातही शिक्षकांना शाळेतच थांबावे लागणार आहे.
राज्यातील शालेय शिक्षण विभागाने या उपक्रमातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के भाषा आणि अध्ययनक्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित, खासगी प्राथमिक, अंशतः अनुदानित या शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असून, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांत 5 मार्च ते 30 जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणार असून, यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमध्ये अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे द्यावे लागणार असून, अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही. हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ऑफलाइन अथवा ऑनलाइन अध्यापन करावे लागणार आहे.
‘निपुण भारत’ उपक्रमात प्रगत होणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षमता व प्रगती तपासण्यासाठी ‘चावडी वाचन व गणन’ कार्यक्रम करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागपातळीवरून देण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी अचानक जिल्हाभरातील सर्व शाळांना भेटी देत या उपक्रमाच्या तयारीची माहिती तपासली. तसेच पुढील काळात सातत्यानेही | तपासणी जिल्हा परिषदपातळीवरून करण्यात येणार आहे.
‘निपुण भारत’ उपक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या विहित कालावधीत अपेक्षित अध्ययनस्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळा अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. उपक्रमात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीलाही सहभागी करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारी शाळांमधील विद्याथ्यर्थ्यांच्या गुणवत्तेबाबत ‘असर’ या संस्थेच्या वतीने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालात सरकारी शाळेतील विद्याथ्यर्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ‘असर’ या संस्थेच्या अहवालाला शह देण्यासाठी राज्यपातळीवरून शालेय शिक्षण विभागाने ‘निपुण भारत’ कार्यक्रमात सरकारी, तसेच अनुदानित | शाळांमधील दुसरी ते पाचवी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
या उपक्रमात मार्च महिन्यापासून विशेष तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत दरआठवड्याला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रगती तपासणे बंधनकारक असून, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा तपासणी अहवाल सादर होणार आहे. 100 टक्के अध्ययनक्षमता विकसित होणे गरजेचे असून, भाषाज्ञान व संख्याज्ञानाची आठवड्याला परीक्षा होईल. उन्हाळी सुट्टीतील मोहिमेची अंतिम मुदत ३० जून असून, शिक्षकांनी सुट्टीतही मोहीम पूर्ण करणे गरजेचे आहे. अप्रगत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलणे बंद करून, त्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अभ्यासाची तयारी करूनच नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश करावा लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List