हा बाबासाहेबांचा संघर्ष! जय भीम, जय संविधान; गौरव मोरेच्या ‘जयभीम पँथर’चा ट्रेलर पाहिलात का?
दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा आजवर आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे. आता लवकरच या विषयावर ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून एक वेगळी कथा उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे.
काय आहे ट्रेलर?
दलित, शोषित बहुजन समाजातील घटकांवर अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या प्रत्येक बहुजन संघटनेची आणि त्यांच्या संघर्षाची सर्वसमावेशक कहाणी ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट मांडणार आहे. जातींमधील संघर्ष, दलितांमधील अत्याचार, बहुजन राजकारण, शिक्षण याचे चित्रण करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करणार आहे. आजच्या काळात राजकारण बदलत असताना, जातीय संघर्ष वाढत असताना एक वेगळा सर्वसमावेशक विचार देण्याचा प्रयत्न ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट करत असल्याचं ट्रेलरवरून दिसतं आहे. अनुभवी अभिनेत्यांचा अभिनय, कसदार लेखन दिग्दर्शनांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल यात शंका नाही.
वाचा: सर्वांसमोर अमरीश पुरींनी स्मिता पाटीलच्या लगावली होती कानशिलात, नंतर अभिनेत्रीने जे काही केलं…
चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?
‘जयभीम पँथर’ या चित्रपटात अभिनेता गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटातील ‘माझ्या भीमाची जयंती’ हे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील गीत चांगलेच गाजत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List