मोदी ट्विटर PM, सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश; ‘टॅरिफ वॉर’वरील मौनावरून संजय राऊत यांची घणाघाती टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर परस्पर शुल्क लादले आहेत. यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 26 टक्के शुल्क लादले आहे. याचा थेट फटका हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. मात्र यावर ट्रम्प यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन आहेत. याचाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉकमध्ये आहेत. तिथे त्यांच्या मेंदूची मालीश सुरू आहे. बँकॉकला जाऊन लोक फ्रेश होतात आणि हे तिथून ट्विट करत आहेत. व्यापार युद्ध सुरू झाले आहे, अमेरिकेने 26 टक्के शुल्क लावले आहे आणि उद्योग, शेअर बाजार यावर याचा परिणाम होणार असून रुपया पडला नाही तर पडून मेलाय. पण मोदी बँकॉकमधून ट्विट करत आहेत. मोदी ट्विटर पीएम आहेत. सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश असून ते सोशल मीडियाचे पीएम आहेत आणि तिथे राज्य करत आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
अमेरिकेने परस्पर शुल्क लागू केल्याने उद्योग, अर्थव्यवस्थेवर हल्ला झाला आहे. चीनने ट्रम्प यांना दम दिला आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेवर उलटा टॅरिफ लावला आहे, पण मोदी बँकॉकमध्ये फिरत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, वक्फ बोर्ड बील आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. भ्रष्टाचाराला कायदेशीर चौकटीत बसवण्यासाठी हे बिल आणले आहे. वक्फ बोर्डाची दोन लाख कोटी रुपयांची जमीन सरकारच्या लाडक्या उद्योगपतींना खायची आहे. आम्ही याच भ्रष्टाचाराविरोधात आणि भाजपच्या ढोंगाविरुद्ध मत दिले.
आमच्याकडे पक्षादेश मानला जातो, मोदी-शहांचा आदेश नाही. वक्फ बोर्ड बिलला समर्थन द्यावे म्हणून दिल्ली आणि महाराष्ट्रातील बडे नेते अखेरच्या मिनिटापर्यंत आमच्या नेत्यांच्या संपर्कात होते. नाही तर देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करायची काय गरज होती. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये हे बिल मोठ्या बहुमताने पास झालेले नाही. 273 चे बहुमत असून किती मते मिळाली बघा. आमचे काही सदस्य आजारी होते, काही बाहेर होते अन्यथा आमचा आकडा वाढला असता. राज्यसभेतही हेच झाले. मोदींनी ओडिशाचे नेते नवीन पटनायक यांच्यावर प्रचंड दबाव टाकला आणि त्यामुळे सात लोकांनी पलटी मारली. बहुमत असतानाही हा खेळ अखेरच्या क्षणापर्यंत सुरू होता. आमच्यासोबतही हा खेळ करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही झुकलो नाही, दबावात आलो नाही, असेही राऊत म्हणाले.
अमेरिकेच्या टॅरिफने चीन, ऑस्ट्रेलियाची चांदी; जागतिक मंदीच्या सावटात मोठ्या संधीची चाहूल
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List