पश्चिम रेल्वेच्या नाकाबंदीविरोधात हजारो सफाळेवासी रस्त्यावर; मार्ग खुला न केल्यास रेलरोको करण्याचा इशारा
पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण व समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग (डी.एफ.सी.सी) कार्यान्वित होत असल्याने सफाळे येथील रेल्वे फाटक 31 मार्च रोजी अचानक बंद करण्यात आले. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता फाटक बंद करून नाकाबंदी केल्याने हजारो नागरिकांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यामुळे सफाळे तसेच परिसरातील चाकरमानी, व्यापारी, मच्छी विक्रेता तसेच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत फाटक बंद होणार नाही, असे आदेश दिले असताना डीएफसीसीच्या अधिकाऱ्यांनी फाटक बंद केलेच कसे, असा सवाल यावेळी नागरिकांनी केला. तत्काळ मार्ग खुला न केल्यास रेलरोको आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सफाळे गाव व सफाळे स्टेशनलगत बाजारपेठ, शिक्षण संस्था, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, मुख्य बाजारपेठ, बँक, मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय असे जवळपास सर्वच मुख्य कार्यालये, संस्था व प्राधिकरणे आहेत. येथे पूर्व व पश्चिम जोडणारे सफाळे रेल्वे फाटक हा एकच मार्ग असून याठिकाणाहून सफाळे व त्याच्या लगत इतर गावांशी संपर्क ठेवण्याचा प्रमुख मार्ग आहे. या फाटक मार्गाने दररोज 42 गावांमधील किमान 50 हजारपेक्षा जास्त नागरिकांची ये-जा होत असते. मात्र अचानक फाटक बंद केल्याने नागरिकांची नाकाबंदीच झाली आहे.
प्रशासनाची धावाधाव, सोमवारी बैठक
आंदोलनाच्या दणक्याने प्रशासनाची अक्षरशः धावाधाव झाली. उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. फाटक व संपूर्ण स्टेशनची पाहाणी करून तातडीने जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारी कृती समितीसोबत बैठक आयोजित केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List