धनंजय मुंडेंना माझगाव न्यायालयाचा झटका, करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखाची पोटगी देण्याचा निर्णय कायम
करुणा मुंडे पोटगीप्रकरणी अजित पवार गटाचे बडे नेते धनंजय मुंडे यांना माझगाव सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळून लावत न्यायालयाने करुणा मुंडे यांना दिलासा आहे. करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. मासिक दोन लाख रुपये पोटगी देणे धनंजय मुंडे यांना बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, वांद्रे न्यायालयाच्या या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी करुणा मुंडे यांनी न्यायालयाने मागितलेली सर्व कागदपत्रं हजर केली. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली.
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे 27 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नापासून धनंजय मुंडे यांना दोन मुलंही आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. यानंतर करुणा मुंडे यांनी न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच अन्य सर्व कागदपत्रं न्यायालयात सादर केले. मात्र, करुणा मुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रं खोटी असल्याचा दावा करत धनंजय मुंडेंकडून माझगाव सत्र न्यायालयात आव्हान याचिका सादर केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List