‘दिल चाहता है’मधील अभिनेते राकेश पांडे यांचे निधन, वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड, टीव्ही आणि भोजपुरी इंडस्ट्रीत काम करणारे अभिनेते राकेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. राकेश पांडे यांनी शुक्रवारी 21 मार्च रोजी सकाळी 8.50 वाजता जुहू येथील आरोग्यनिधी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी जसमीत आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शास्त्रीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राकेश पांडे यांचे करिअर
राकेश पांडे यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवास १९६९ साली बासू चॅटर्जी यांच्या ‘सारा आका श’ या क्लासिक चित्रपटाने सुरू झाला. या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथून प्रशिक्षण घेतले आणि नंतर भारतेंदू नाट्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते रंगभूमीवर सक्रिय होते.
राकेश पांडे यांच्या सिनेमांविषयी
राकेश पांडे हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) शी जोडले गेले होते. त्यांच्या अभिनयात नैसर्गिकता आणि वास्तविकता होती. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी ‘मेरा रक्षक’, ‘यही है जिंदगी’, ‘वो मैं नहीं’, ‘दो राहा’ आणि ‘ईश्वर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर भोजपुरीमध्ये त्यांनी ‘बलम परदेसिया’ आणि ‘भैय्या दूज’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. काही वर्षानंतर ‘देवदास’ (2002), ‘दिल चाहता है’ (2001), ‘लक्ष्य’ (2004) आणि ‘ब्लॅक’ (2005) सारख्या हिट सिनेमांमध्ये ते दिसले होते.
मालिकांमध्येही केले काम
राकेश पांडे यांनी काही मालिकांमध्ये ही काम केले आहे. ‘छोटी बहू’, ‘दहलीज’ आणि ‘भारत एक खोज’ (1988) सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ते दिसले होते. दोन दशकांहून अधिक काळ अभिनयापासून दूर राहिल्यानंतर 2017मध्ये ते कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ चित्रपटात दिसले. तसेच त्यांनी ‘हुरदंग’ (2022) आणि ‘द लॉयर्स शो’ या वेब सीरिजमध्ये देखील भूमिका साकारली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List