दोन लहान मुलांच्या तोंडात बोळा कोंबून आईवर बसचालक, वाहक आणि हेल्परने केला सामूहिक बलात्कार
कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथे एका खासगी बसमध्ये एका महिलेवर तिच्या मुलांसमोरच सामूहिक बलात्कर करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी ही घटना घडली. महिला आपल्या दोन मुलांना घेऊन हरपनहल्ली येथील उच्छंगीदुर्गा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी महिला घरी जायला निघाली. यावेळी तिने मंदिरापासून दावणगेरेला जाणारी शेवटची बस पकडली. यावेळी बसमध्ये महिलेसोबत आणखी सात आठ प्रवासी होते. दरम्यान, काही वेळाने सर्व प्रवासी उतरल्यानंतर बसच्या चालकाने बस चन्नापुराजवळ एका निर्जन ठिकाणी नेली आणि संधीचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, यावेळी बस चालकासोबत कंडक्टर आणि हेल्परही होते. या तिघांनी मिळून पीडित महिलेच्या मुलांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातपाय बांधले. यानंतर त्या निरागस मुलांच्या समोरच पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान, महिलेचा आवाज एकून काही शेतकरी महिलेच्या मदतीसाठी धावले आणि आरोपींनाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, चालक प्रकाश माडीवालारा, कंडक्टर सुरेश आणि हेल्पर राजशेखर अशी या आरोपींची नावे आहेत.
धक्कादायक माहिती अशी की पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. एवढेच नाही तर त्यांनी महिलेला 2 हजार रुपये देऊन तिला नवीन कपडे खरेदी करायला सांगितले. याचसोबत तुमचे जगणे कठीण होईल. त्यामुळे गुन्हा नोंदवू नका, असा सल्ला दिला. जर गरज भासली तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ, असेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला पुन्हा उच्छंगीदुर्गा मंदिरात सोडले.
पीडित महिला पुढील 2 दिवस मंदिरातच आपल्या मुलांसोबत राहिली. याबाबत स्थानिक नेत्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच विजयनगरचे एसपी श्रीहरी बाबू यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एसपी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List