खतरनाक लघुग्रह चंद्रावर धडकणार!
ग्रहांच्या जवळून जाणारे लघुग्रह म्हणजे पृथ्वीसाठी धोकादायक असतात. हे लघुग्रह पृथ्वीवर आदळून अनर्थ होण्याची शक्यता असते. मात्र शास्त्रज्ञांना असा एक लघुग्रह दिसलाय जो पृथ्वीवर आदळणार नसला तरी चंद्रावर आदळू शकतो. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या शक्तिशाली जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने ‘2024 वायआर 4’ या लघुग्रहाच्या हालचाली टिपल्या आहेत. डिसेंबर 2032 मध्ये लघुग्रह पृथ्वी आणि चंद्राच्या जवळून जाईल.
नव्या अहवालानुसार, हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार नाही, पण चंद्राला धडकण्याची शक्यता अजून कायम आहे. सिटी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने सर्वात प्रथम डिसेंबर 2024 मध्ये ‘2024 वायआर 4’ लघुग्रहाचा शोध लावला होता. त्याची दिशा बघून शास्त्रज्ञांनी लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची 3.1 टक्के शक्यता वर्तवली होती. मात्र नासाने ही शक्यता आता शून्य टक्क्यावर आणली आहे.
‘2024 वायआर 4’ हा लघुग्रह 53- 67 मीटर व्यासाचा, साधारण 15 मजली उंच इमारतीएवढा आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नव्या डेटानुसार ‘2024 वायआर 4’ लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक नाही. मात्र त्याची चंद्राशी टक्कर भीतिदायक ठरू शकते.
‘सिटी किलर’ खडकाचा अभ्यास
लघुग्रहाच्या टकरीत संपूर्ण शहर बेचिराख होऊ शकते. 500 हिरोशिमा बॉम्ब एवढी ताकद निर्माण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने या खतरनाक अंतराळ खडकाचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे.
चंद्राशी टक्कर झाल्यास…
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे खगोलसंशोधक आणि सहलेखक एंड्रयू रिवकिन यांनी सांगितले की, या लघुग्रहाची चंद्राशी टक्कर होण्याची शक्यता सुमारे 2 टक्के अजूनही कायम आहे. जेडब्ल्यूएसटीच्या डेटामुळे असे दिसून येतेय की, ‘2024 वायआर 4’ ची चंद्राशी टक्कर झाली तर हे संशोधकांसाठी अनोखी संधी निर्माण होणार आहे. कारण आपल्या नजरेसमोर एक नवे विवर बनताना पाहू शकणार आहोत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List