पालिकेच्या रस्त्याची 2018 कामे रखडली; मुंबईकरांचा यंदाचा पावसाळादेखील खड्ड्यात
खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण आखणाऱ्या पालिकेचा दावा फोल ठरणार असल्याचे सिद्ध होत आहे. कारण पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना मुंबईत अजूनही 701 किमीची तब्बल 2018 कामे सुरूच आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे अशक्य असल्याने मुंबईकरांचा पावसाळा या वर्षीदेखील खड्ड्यातच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडत असल्याने सामान्यनागरिकांसह प्रवासी, वाहतूकदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, दरवर्षी या कामासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात असताना प्रत्येक वर्षी खड्डे पडत असल्याने आता पालिकेने सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला आहे. यानुसार रस्त्याची कामे सुरू आहेत.
असे होतेय काम…
पालिकेकडून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणात आतापर्यंत 1 हजार 333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे, तर उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यामधील एकूण 698 रस्त्यांची कामे (324 किलोमीटर), तर दुसऱ्या टप्प्यात एकूण 1420 रस्त्यांचे (377 किलोमीटर) काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.
रस्तेकामांसाठी 9 कंत्राटदार नेमण्यात आले असून त्यांच्यामध्ये कामाच्या प्रगतीत फरक आहे. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने, तर काही कंत्राटदार धिम्या गतीने कामे करत आहेत.
…तर इंजिनीयरवर कारवाई
कंत्राटदारांनी सर्व कामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कंत्रादारांची बिलेदेखील विनाविलंब द्यावीत. जर ही बिले कारणाशिवाय प्रलंबित ठेवल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे सक्त निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेवर होणारी टीका संधी समजून काम करण्याचे आवाहनही आयुक्तांनी यावेळी दिले.
कामात दिरंगाई झाल्यास काम काढून घेणार
रस्त्याचे काम करताना कंत्राटदारांनी प्रदूषण नियंत्रण आणि नागरिक-वाहतूकदारांच्या दृष्टीने सुरक्षेचे सर्व नियम पाळलेच पाहिजेत. काही कंत्राटदारांकडून कामे रखडवल्याचे समोर येत असल्यामुळे विहित वेळेत काम पूर्ण झाले नाही तर काम काढून घेण्याचा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List