आंदोलनकर्त्यांना ‘ शो ‘ म्हणणारे असे भंपक सरकार यापूर्वी कधीही राज्यात नव्हते; संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारल्याने एका गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेविरोधात रुग्णालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ‘शो’ करत आहेत, असे असंवेदनशील वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी ‘आंदोलनकर्त्यांना ‘ शो ‘ म्हणणारे असे भंपक सरकार यापूर्वी कधीही राज्यात नव्हते, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
”काल त्या महिलेच्या मृत्यूविरोधात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर काही संघटनांनी आंदोलन केलं. ते वर वगैरे चढून आंदोलन करत होते. त्यावर फडणवीस म्हणाले ते ‘शो’ करत आहेत. एक बाई मेली. दोन मुलं पोरकी झाली आणि मुख्यमंत्री आंदोलनकर्त्यांना शो करतायत असं बोलतात. इतकं भंपक सरकार कधी या महाराष्ट्रात आलं नव्हतं. यांच्या आरएसएसचे लोकं, भाजपचे समर्थक त्या रुग्णालयाच्या संचालक मंडळावर आहेत. म्हणून रुग्णालयावर कोणतीही कारवाई होत नाहीय. मुख्यमंत्री बनायला जी लेव्हल लागते त्या लेव्हलपर्यंत पोहचेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी मराठी मुद्द्यांवरील मनसेच्या आंदोलनांबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली. त्यांच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा. मराठी बाबतचं ज्या प्रकारचं आंदोलन मी पाहत होतो त्याला मी आंदोलन म्हणणार नाही. बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्हीही आंदोलन केलं आहे. लोकांच्या कानफाडात मारली आहे. पण आम्ही बँकांमध्ये, एअर इंडियात अनेक मोठ्या सरकारी कार्यालयामध्ये मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी त्यांचे क्लासेस शिवसेना भवनात येथे सुरू केले होते. गेली वर्षानुवर्ष हे क्लासेस चालवून आम्ही त्यांची मानसिक तयारी करून घेतली. तेवढं करूनही ती मूलं नोकरीत आली नाही तेव्हा आम्ही आंदोलनं केली. स्पर्धेत आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर आपण त्यांची तयारी करून घेतली पाहिजे. आजही शिवसेना भवनात व बाळासाहेब व माँसाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या आयएएस अॅकॅडमीत मुलांचं प्रशिक्षण सुरू आहे. याला विधायक काम म्हणतात. माऱ्यामाऱ्या आम्हीही खूप केल्या आहेत. पुढेही करू. पण आंदोलनांना अशा प्रकरची एक दिशा द्यावी लागते. आम्ही हजारो मूलं बँकेत नोकरीला लावली. त्यामुळेच आजही मराठीचं आंदोलन आणि शिवसेनेचं नाव जोडलेलं आहे. मराठी भाषेचा आग्रह धरून बँकांमध्ये सरकारी आस्थापनांमध्ये वापरायला लावली. त्यासाठी आम्ही कोणालही कानफाटात मारली नाही. दुर्बलांवर हात टाकून चालत नाही. मी एक सिनेमा केला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर, त्यात एक सिन आहे. आम्ही एअर इंडियाच्या चेअरमॅन कॅप्टन नंदा यांच्या कानफाटात मारली. एअर इंडिया बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्या कानफाटात मारली, वॉचमन शिपाई चहा देणाऱ्याच्या कानफटात मारून काही होतं का? मूळात देवेंद्र फडणवीसांच्या प्रेरणेने हे आंदोलन होतंय. देवेंद्र फडणवीसांनी कधी मराठी माणासासाठी आंदोलन केलंय. त्यांना या राज्यात गोंधळच घालायचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List