माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल
कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता? कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, असे आक्षेपार्ह विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्या निशाणा साधला. माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झाले आहेत. रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, टिंगल करताहेत, अशा शब्दात राऊत यांना माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्ला चढवला. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झाले आहेत. ते अनेक वर्षापासून राजकारण आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारी विधाने करू नयेत. अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे, प्रफुल्ल पटेल सारख्या लोकांना लगाम घातला नाही तर त्यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणे ऐकली तर त्यांनी कॉमेडी शो सुरू केलेले आहेत. स्वत: अजित पवार कॉमेडी शो करत आहेत. राष्ट्रीय कार्याध्यक्षांचाही कॉमेडी शो सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्रीही रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. टिंगल करत आहेत. राज्यात नक्की काय चालले आहे?’
‘कृषिखात्यात नीट काम चाललेले नाही. गृहखाते तर पार कोसळून गेले आहे. हे करेन, ते करेन, कायदा हातात घेऊ देणार नाही असे इशारे देत बसले आहेत. तुमच्यासमोबर कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत. काल नागपुरात गोळीबार झाला. जिथे देवेंद्र फडणवीस यांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जाते तिथे गोळीबार झाला. कायद्याच्या गोष्टी काय सांगता’, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘राज्याची कायदा सुव्यवस्था अत्यंत भयावर आहे. नुसती विरोधकांची टिंगल, टवाळी करून राज्य चालत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या लेव्हलला यायला पाहिजे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरद पवार, उद्धव ठाकरे या लेव्हलला पोहोचायला फडणवीस यांना वेळ लागेल. त्यांची ती लेव्हल अद्याप आलेली नाही.’
‘मुख्यमंत्रीपदावर बसले म्हणजे ती लेव्हल येत नसते, तो टोलेजंगपणा आपल्या कामातून मिळवावा लागतो. पण गृहखात्याचा अक्षरश: कचरा झालेला आहे. नुसते इशारे देतात. विरोधी पक्षासंदर्भात तक्रार दिली की लगेच पोलिसांना आदेश जातो. असे गृहखाते चालते का? हे अमित शहांचे चेले शोभतात’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List