यात्रांसाठी नारायणगावची तमाशा कलापंढरी सज्ज
राज्यभरातील जत्रा, यात्रा तसेच उरूस यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगावची तमाशा कलापंढरी सज्ज झाली आहे. येथील विठाबाई नारायणगावकर तमाशा कलापंढरीमध्ये यावर्षी एकतीस फड मालकांच्या राहुट्या उभारणात आल्या आहेत. मागील महिनाभरात लोकनाट्य कार्यक्रमांचे आजअखेर ३१४ करार झाले आहेत. या माध्यमातून सुमारे ४ कोटी ९० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. तमाशाचे कार्यक्रम ठरविण्यासाठी राहुट्यामध्ये गावोगावचे पुढारी तसेच यात्रा समितीच्या प्रमुखांची गर्दी दिसत असून करार करण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. गुढीपाडव्याला तमाशा ठरवण्याची अनेक गावांची परंपरा आहे, म्हणून येथे मोठी गर्दी होत असते.
दरम्यान, नारायणगावात राज्यातील फडमालकांनी रंगीबेरंगी आकर्षक राहुट्या उभारून तमाशा कार्यक्रमाचे करार करण्यास 20 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात केली. राहुटीच्या दर्शनी व आतील बाजूस फडाचे नाव, प्रमुख कलावंत, सोंगाड्या, गायक किंवा नृत्यांगना आम्रपाली यांचे फोटो लावून राहुट्या आकर्षित केल्या आहेत. तमाशाचे करार करण्यासाठी येणाऱ्या यात्रा समितीच्या प्रमुखांच्या बैठकीसाठी गाद्या, तक्के, खुर्चा, कुलर, फॅन बसवून राहुट्या सुसज्ज केल्या आहेत. येथील पुणे-नाशिक महामार्गालगत विटे को-हाळे मळ्यासमोर उभारलेल्या राहुट्या लक्ष वेधून घेत आहेत.
तमाशा ठरविण्यासाठी गावोगावच्या यात्रा प्रमुखांची चढाओढ असते. 100 पेक्षा जास्त कलावंत, कर्मचारी व गाड्यांचा मोठा ताफा असलेल्या मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, विठाबाई नारायणगावकर, पांडुरंग मुळेसह तुकाराम खेडकर, सर्जेराव जाधव चंद्रकांत ढवळपुरीकर, मालती इनामदार, काळू-बाळू, भिका-भीमा सांगवीकर, आनंद लोकनाट्य, दत्ता महाडिक, संध्या माने, शिवकन्या बडे, दीपाली सुरेखा पुणेकर, जगन कुमार वेळवंडकर, अंजलीराजे नाशिककर या फडांचे प्रमुख तारखांसह 15 ते 30 करार झाले आहेत, तर गायक, नृत्यांगना, कर्मचारी अशा 50 ते 60 जणांचा ताफा असलेल्या हंगामी फडाचे पाच ते दहा करार झाले आहेत. नारायणगाव हे राज्यातील तमाशा फड मालकांचे केंद्र आहे. येथे मागील वर्षी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही यात्रा रद्द झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला होता. यावर्षी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कार्यक्रमाला मागणी वाढली आहे. यंदा 1 एप्रिल ते 15 मे दरम्यान यात्रा उत्सव होत आहे.
यावर्षी आनंद लोकनाट्य, पांडुरंग मुळे, विठाबाई नारायणगावकर, अंजली नाशिककर, मंगला बनसोडे या प्रमुख तमाशांचे उच्चांकी करार तीन ते चार लाख रुपयांच्या दरम्यान झाले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी सांगितले की, ‘सलग पाचव्या वर्षी आम्ही कलापंढरीमध्ये राहुटी न लावताच 13 मे पर्यंतच्या 45 तारखा फोनवर बुक झाल्या आहेत.’ चौफुला (ता. दौंड) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त कालाष्टमीची सुपारी ग्रामस्थांनी चार लाख रुपयांना बुक केली आहे. यावर्षी लोकनाट्य कार्यक्रमांना चांगली मागणी आहे, असेही फडमालक रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List