छताचे प्लास्टर कोसळले; मलब्याखाली दबून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
भिवंडीच्या नागाव परिससात छताचे प्लास्टर कोसळून मलब्याखाली दबून सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने भिवंडीतील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका कानाडोळा करत असल्याने हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचाच बळी असल्याची टीका होत आहे.
नागाव परिसरातील इमारतीच्या तळमजल्यावर शमीम अन्सारी हा कुटुंबीयांसह भाड्याने राहत आहे. त्याची पत्नी शमा अन्सारी व सहा महिन्यांचा चिमुरडा शोएब हे घरात पलंगावर झोपले होते. त्यावेळी अचानक छतावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने ते मलब्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता शोएबचा मृत्यू झाला, तर आई शमा ही जखमी झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहितीच नाही
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या घटनेबाबत अपघाती मृत्यूची नोंद केली असून कोणाविरोधात तक्रार नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे १७ मार्चला घटना घडूनही पलिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष अथवा स्थानिक प्रभाग समिती कार्यालयाला ही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List