पैसे खाण्यास सोकावलेल्या मंडळींना सरळ करु; अजित पवार यांचा इशारा, मलिदा गँगवरही जोरदार प्रहार
बारामती तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, तरीही काही जण लोकांकडे कामांसाठी पैशांची मागणी करीत आहेत. पैसे खाण्यास सोकावलेल्या अशा मंडळींना सरळ करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मलिदा गँगवरही त्यांनी जोरदार प्रहार केला.
बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात पवार यांनी हा इशारा दिला. माळेगावातील एका शेतकऱ्याला वारस नोंद लावण्यासाठी तलाठ्याकडून १५ हजार रुपये मागितले असल्याची तक्रार पवार यांच्याकडे आली. त्यावर पवार यांनी तालुक्यात कार्यरत अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा दिला.
पवार म्हणाले, ‘शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जात आहे. आता आठवा वेतन आयोगाची तयारी आहे. तरीही काही मंडळी पैसे मागत आहेत. मी असले धंदे खपवून घेणार नाही. मग तो कोणाच्याही वशिल्याने आलेला असू द्या. काहीजण पैसे खायला फारच सोकावले आहेत. मी वारंवार सांगूनही त्यांच्यात दुरुस्ती होताना दिसत नाही. त्यामुळे लक्ष घालून अशा लोकांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही’, असे पवार म्हणाले.
तुम्ही बटण दाबले म्हणजे…
पवार यांनी या वेळी प्रत्येक कार्यक्रमात निवेदने देणाऱ्यांचाही समाचार घेतला. माझ्या सहायकांकडे निवेदने दिली तरी ती माझ्याकडे पोहोचतात. माझ्याच हातात निवेदने द्यावीत, हा आग्रह कशाला, असा सवाल करून पवार म्हणाले, ‘मी एखाद्या कार्यक्रमात असलो तरी माझ्या कामाचे तेवढे बघा, असे सांगून व्यासपीठावरील काहींना खुणवले जातेय, तुम्ही बटण दाबले म्हणजे… एक लक्षात घ्या मी दुसऱ्यांना आमदार करू शकतो. तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतोय, त्यामुळे तुम्हाला जाणीव नाही’, असे पवार म्हणाले.
नेतेगिरी करायची असेल तर ठेकेदारी नको
मी एवढा कडक वागतो तरी काहींकडून मला काम द्या, हे टेंडर मला द्या असली मागणी केली जात आहे. एक तर मलिदा गँगमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्याला नेतेगिरी करायची त्याने ठेकेदारी करू नये आणि ज्याला ठेकेदारी करायची आहे त्याने नेता बनू नये, असे पवार म्हणाले.
कर्करोग प्रतिबंधक लस मोफत देणार
बारामती तालुक्यातील 9 ते 15 वयोगटातील मुलींसाठी कर्करोग प्रतिबंधक लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यासंबंधी मेळावा घेऊन लसीकरण केले जाईल, खर्चाची जबाबदारी स्वतः उचलणार असल्याचेही पवार यांनी जाहीर केले. पवार म्हणाले, ‘महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मध्यंतरी आदर पूनावाला यांच्याशी माझी भेट झाली, तेव्हा यासंबंधी चर्चा झाली. पूनावाला यांनी कर्करोग प्रतिबंधक लस तयार केली आहे. ती सर्व मुलींना मिळावी यासाठी राज्य पातळीवरही आम्ही धोरण आखत आहोत.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List