दादा, दोन गाड्या जनतेच्या वतीने देतो… आमचे प्रश्न सोडवा! शिवसेना उपनेते संजय पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला
दादा, दोन गाड्या जनतेच्या वतीने देतो… परंतु आमचे प्रश्न सोडवा.. पुढच्या मीटिंगवेळी दादांनी शिष्टाचाराच्या आलिशान वाहनाबरोबरच जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रशासनाला सूचना कराव्यात, अशी रोखठोक भूमिका दादांकडून अपेक्षित असल्याचा खोचक टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी एका पत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
मंत्री अजित पवार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, त्यांच्या प्रोटोकॉलनुसार वापरात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून, त्यांनी प्रशासनाला सुनावत पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सूचित केले. स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजाबरोबर सामाजिक कामाविषयी पण नेहमीच सतर्क असणाऱ्या दादांना स्वतःच्या गाडीच्या सुविधांबद्दल सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे, याचा शोध आणि बोध घेण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झालेली नाही काय? असा सवाल संजय पवार यांनी केला आहे.
नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करून कोल्हापूरच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता देणारे हे शासन येथील अनेक प्रलंबित प्रकल्पांबाबत लक्ष कधी देणार? तत्कालीन पालकमंत्र्यांनी घोषणा करून शंभर कोटींसह रखडलेले रस्ते, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छ कोंडाळ्यात साचलेल्या ढीगासह लोकांचा श्वास गुदमरणारा झुम प्रकल्प, राजकीय श्रेयवादात रखडलेले प्रश्न तसेच आत्महत्या करायच्या तयारीतील कंत्राटदार, सुधारणेच्या प्रतीक्षेतील शाहूजन्मस्थळ अशा अनेक प्रश्नांवर कोल्हापूर लढत असताना, कर्तव्यदक्ष अजितदादांनी शिष्टाचाराला चांगली गाडी नाही, याविषयी प्रशासनाला झापण्याऐवजी कोल्हापूरच्या या प्रलंबित प्रश्नांबाबत खडसावलं असतं तर योग्य झालं असतं. कित्येक दिवसांपासून श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासह अनेक प्रलंबित प्रश्न आणि प्रकल्पांकडे निधीची व्यवस्था नसल्याचेही या पत्रकातून निदर्शनास आणून दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List