Kunal Kamra – कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या ‘गद्दार’ गीतामुळे बदनामी झाल्याची तक्रार मिंधे गटाने केली आहे. त्याआधारे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यात कामराला मद्रास उच्च न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कामराने ‘गद्दार’ गीत गायले. त्या गीतात गद्दारीसह गुवाहाटीपर्यंतचा पळ तसेच इतर गोष्टींवर बोट ठेवल्यामुळे मिंधे गट अस्वस्थ झाला आहे. याच अस्वस्थतेतून पोलिसांमार्फत कामराला अटक करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याचवेळी जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याने कामराने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज केला. त्याच्या अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी तातडीने सुनावणी घेतली. मिंधे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या गुह्यात अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती कामराच्या वकिलांनी केली. त्यांची विनंती मान्य करीत न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत कामराला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
- ‘गद्दार’ गीतामुळे चवताळलेले मिंधे गटाचे कार्यकर्ते धडा शिकवण्याची भाषा करत आहेत. त्यातील काही लोकांनी माझ्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. तोडफोड करणारे जामिनावर सुटले आहेत, याकडे कामराच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
मुंबईत माझ्या जिवाला धोका!
‘गद्दार’ गीतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे, मात्र आपण गाण्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचे थेट नाव घेतलेले नाही. असे असताना मला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत 500 हून अधिक धमकीचे फोन कॉल्स आले आहेत. मुंबईत गेल्यास माझ्या जिवाला धोका होऊ शकतो, असा युक्तिवाद कामराच्या वतीने वकिलांनी केला.
- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व कुणाल कामराच्या विरोधात विधान परिषदेत दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी स्वीकारला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List