शाहीर, जादूगार, शिल्पकारांची पेन्शन वर्षभरापासून बंद! शिवसेनेने केद्राकडे उठवला आवाज; तत्काळ पेन्शन सुरू करण्याची मागणी
देशातील शाहीर, जादूगार, शिल्पकार, भजन गायक यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांना केंद्र सरकारकडून नियमित पेन्शन देण्यात येते. ही पेन्शन योजना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ बंद असल्यामुळे हे ज्येष्ठ कलाकार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करून या कलाकारांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी पेंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली.
हिंदुस्थानातील दिग्गज कलाकारांना पेंद्र सरकारच्या वतीने दर महिन्याला पेन्शन देऊन त्यांचा आदर राखला जातो. या ज्येष्ठ कलाकारांना दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन दिले जाते. त्यातील सहा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातात, तर चार हजार रुपये पेंद्र सरकारकडून दिले जातात. डिसेंबर 2023 पर्यंत या ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र, जानेवारी 2024 पासून त्यांचे पेन्शन अचानकपणे बंद करण्यात आले असून गेल्या एक वर्षाहून जास्त काळ त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. हे कलाकार वृद्ध असल्यामुळे पैशाअभावी यांची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांसाठी असलेली पेन्शन योजना तत्काळ पुन्हा सुरू करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन केली. याबाबतचे पत्र त्यांनी शेखावत यांना दिले असून यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List