स्वातंत्र्याला 78 वर्षे झालीत, आता तरी भडकावू भाषणे बंद करा; हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण
स्वातंत्र्याला 78 वर्षे झालीत. आता तरी भडाकवू भाषणे थांबायला हवीत. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी वक्त्यांनी घ्यायला हवी. तुम्ही शेजाऱ्याला त्रास दिलात तर तुम्हालाही त्रास होणारच हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायला हवे, असे गंभीर निरीक्षण गुरुवारी उच्च न्यायालयाने नोंदवले.
सकल हिंदू समाजाने गुढीपाडव्याला विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. मालेगावच्या यशस्वी कंपाऊंड मैदानात हे संमेलन होणार आहे. या कार्यक्रमाला सशर्त परवानगी देताना न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने हे गंभीर निरीक्षण नोंदवले. हे संमेलन रमजान ईदच्या आदल्या दिवशी आहे. स्वातंत्र्याची 78 वर्षे व संविधानाची 75 वर्षे साजरी होत आहेत. या देशातील नागरिक साक्षर व सुज्ञ झाले आहेत. या देशात प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील अशी भडकावू भाषणे होणार नाहीत अशी आम्ही आशा बाळगतो, असे परखड मतही न्यायालयाने व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नाशिक कार्यकारी दंडाधिकारी यांनी परवानगी नाकारली होती. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी यासाठी राहुल बच्छाव यांनी याचिका केली होती.
z संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कार्यक्रमाला परवानगी द्यावी, अशी विनंती आयोजकांनी केली होती. मात्र सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या वेळेत कोणत्याही चार तासांत हा कार्यक्रम पूर्ण करा, असे आदेश न्यायालयाने दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List