सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ फक्त अर्ध्यातासाचा! जेवणाच्या नावाखाली कर्मचारी गायब असेल तर दाखवा “हे” परिपत्रक
उन्हातान्हातून ग्रामस्थ मंडळी पायपीट करून कामासाठी शासकीय कार्यालयात येतात. आपली कागदपत्रे घेऊन टेबलाजवळ जातात परंतु खुर्चीत साहेब नसतात. साहेब जेवायला गेलेत अशी उत्तरे मिळतात. प्रत्येक शासकीय कार्यालयात सोयीनुसार दुपारच्या जेवणाची वेळ ठरवली जाते. कर्मचाऱ्यांच्या वर्तुणूकीत शिस्त यावी आणि ग्रामस्थांची कामे वेळेत व्हावीत याकरिता शासकीय कार्यालयात दुपारच्या भोजनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान अर्धातासाची भोजनाची सुट्टी घेण्याची मुभा सामान्य प्रशासनाने 4 जून 2019 रोजी परिपत्रकात दिली आहे. तरीही अनेक ठिकाणी अर्धा तास उलटून गेला तरी या सरकारी बाबूंचा ‘लंच टाईम’ आटपत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
सहसचिव मा. वा. गोडबोले यांच्या स्वाक्षरीने शासन परिपत्रक क्र. समय 1019/प्र.क्र.28/18 (र.व का.) नुसार निर्गत करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गाकरिता कार्यालयीन वेळेत भोजनासाठी दुपारी 1 ते 2 वा. यादरम्यान जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ असावी. भोजनासाठी अधिकारी कर्मचारी अधिक वेळ घेणार नाहीत. तसेच एकाच शाखेतील सर्व अधिकारी, कर्मचारी एकाच वेळी भोजनासाठी जाणार नाहीत. याबाबत कार्यालय प्रमुखांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे परिपत्रक 4 जून 2019 रोजी सामान्य प्रशासन विभागाने प्रसिध्दीस दिले आहे. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 201906071616031607 असा आहे.
काही कार्यालयात ‘सेलिब्रेशन’
काही शासकीय कार्यालयात कोणतं तरी निमित्त शोधून ‘सेलिब्रेशन’ केले जाते. एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याची पदोन्नती, बदली किंवा निवृत्ती असल्याचा खास भोजनाचा बेत असतो. यावेळी सर्वच टेबलं रिकामी असतात. काम घेऊन आलेल्या ग्रामस्थांना त्यांचे ‘सेलिब्रेशन’ पहात ताटकळत बसावे लागते. अशा सेलिब्रेशननाही अर्ध्यातासाची मर्यादा असावी किंवा कार्यालयाच्या वेळेत अशी सेलिब्रेशन नकोत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या परिपत्रकानुसार विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी भोजनासाठी नियोजन करुन कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे वादाचे प्रसंग कमी होतील. शिवाय सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावण्यास मदतच होईल. यातून राज्य शासनाची प्रतिमा निश्चितच उंचावली जाणार आहे. -प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List