अहिल्यानगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु; 99 गावांची 26 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध होणार
जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या दोन वर्षांत मुदत संपलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 26 मार्च रोजी या ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
यामध्ये राशिन, हरेगाव, पिंपळस, घारगाव, बुरुडगाव, नेवासा बु., घोडेगाव, तामसवाडी, टाकळी मानूर, मांडवगण, हाळगाव, पारगाव भातोडी आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एप्रिल-मे महिन्यांत 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षात 84 ग्रामपंचायतींचा कालावधी संपलेला आहे. या ग्रामपंचायतींवर सध्या गेल्या वर्षापासून प्रशासक नियुक्त आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात 15 ग्रामपंचायतींचा कालावधी संपणार आहे. 2024 वर्षातील 84 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होऊन प्रभागनिहाय आरक्षणदेखील प्रसिद्ध झालेले आहे. 2025मधील 15 ग्रामपंचायतींची प्रभागरचना पूर्ण होऊन 11 मार्च रोजी आरक्षण सोडत झालेली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील 99 ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार 19 मार्च रोजी या ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर 19 ते 24 मार्चपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर 26 मार्च रोजी 99 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाच्या कडाक्यात 99 ग्रामपंचायतींचे राजकीय वातावरण तापणार आहे.
महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती
राशिन, हरेगाव, पिंपळस, घारगाव, बुरुडगाव, निंबोडी, नेवासा बु., घोडेगाव, भामाठाण, कुमशेत, खडकी खुर्द, धामोरी, शिरसगाव, सारोळे पठार, भामाठाण, मोकळ ओहळ, बेलपांढरी, तामसवाडी, महालक्ष्मी हिवरे, मंगरुळ खुर्द, बुद्रुक, सालवडगाव, टाकळी मानूर, अंबिकानगर, चुंभळी, हाळगाव, धनेगाव, देशमुखवाडी, अंबिकानगर, माही, पारगाव भातोडी, भोयरे पठार, बुद्रूक व खुर्द, जळगाव, मांडवगण, नान्नज दुमला
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List