तळीरामांचा आनंद पोटात मावेना;
उत्तर प्रदेशातील अनेक शहरात दारूच्या एका बॉटलवर एक बॉटल फ्री देण्याची ऑफर सुरू करण्यात आली आहे. या नव्या ऑफरमुळे दुकानांवर तळीरामांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी नियंत्रणाबाहेर जात असून एका बॉटलवर दारूची एक बॉटल फ्री मिळत असल्याने तळीरामांचा आनंद पोटात मावेना असे चित्र दिसत आहे. मुझफ्फरनगरमधील दारूच्या दुकानाबाहेरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. 31 मार्चपर्यंत स्टॉक संपवण्यासाठी दारूच्या दुकानदारांनी ही ऑफर आणली आहे. उत्तर प्रदेशात दुकानांवर मिळत असलेली ऑफर म्हणजे उत्तर प्रदेश सरकारचे नवीन अबकारी धोरण आहे. दुकानांतील दारूचा माल 31 मार्च 2025 पर्यंत संपवायचा आहे. कारण 2025-26 चे नवीन अबकारी धोरण 1 एप्रिलपासून ई-लॉटरीद्वारे दुकानात सुरू केले जाणार आहे. यामुळे दारूचे दुकानदार एका दारूच्या बाटलीवर एक दारूची बाटली मोफत देत आहेत. योगी सरकारच्या या ऑफरवर आम आदमी पार्टीने कडाडून टीका केली आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या अबकारी धोरणावर टीका करणारे भाजपचे दुटप्पी धोरण आता उघडकीस आले आहे. तसेच दिल्लीतील अबकारी धोरणावरून ‘आप’ नेत्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर धाड घालणाऱ्या ईडी आणि सीबीआय या संस्था आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयावर धाडी घालणार का? असा सवाल आतिशी यांनी विचारला आहे.
‘आप’चा भाजपवर हल्ला
‘आप’च्या 2022 अबकारी धोरणावर भाजपने टीका केली होती, परंतु आता भाजपने आणलेले हे नवीन अबकारी धोरण काय आहे? सीबीआय, ईडी यांनी उत्तर प्रदेशातील एकावर एक फ्री दारू वाटणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या अबकारी धोरणाचा तपास करावा, अशी मागणी आतिशी यांनी केली. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या या धोरणाला विरोध म्हणून ‘आप’ संपूर्ण उत्तर प्रदेशात उद्या शनिवार, 29 मार्चला रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी घोषणा ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List