ना खासदार फिरकले, ना आमदाराने दखल घेतली, उपोषणकर्त्या शेतकऱ्याची प्रकृती ढासळली; रुग्णालयात दाखल
एमआयडीसीने अंबरनाथमधील शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर अधिग्रहित केल्या आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी पाले गावात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 10 दिवसांपासून बळीराजा उपोषणाला बसला असतानाही सरकारने दखल घेतलेली नाही. उपोषणकर्त्या एका शेतकऱ्याची प्रकृती ढासळली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. स्थानिक खासदार आणि आमदारांनीही आंदोलकांना भेटून त्यांचे दुःख समजून घेण्याचे सौजन्य दाखवले नसल्याने भूमिपुत्रांमध्ये संताप आहे.
स्थानिक भूमिपुत्रांनी न्याय हक्कासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपजीविकेच्या जमिनी आम्हाला परत कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची मागणी न्याय असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रसारक प्रमोद कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांना धीर आला.
मिंधेना बळीराजाचे दुःख दिसत नाही
उपोषणाला बसलेले शेतकरी बाळाराम सांबरे (५५) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना छाया रुग्णालयात दाखल केले आहे. उपोषणस्थळी येणारे डॉक्टर फक्त रक्तदाब, शुगर चेक करून जातात. आम्हाला योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे. मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांना शेतकऱ्यांचे दुःख दिसत नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List