ठाणे ग्रामीण पोलिसांचे व्हॅनमध्येच ‘मिनी पोलीस स्टेशन’, तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस येणार तुमच्या दारी
शहाण्याने पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, पण आता तक्रार नोंदवून घेण्यासाठी स्वतः पोलीसच तुमच्या दारी येणार आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष व्हॅन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हे फिरते ‘मिनी पोलीस स्टेशन’ 11 ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावागावात तसेच वाड्या, वस्त्यांपर्यंत ग्रामीण पोलीस फिरणार आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागात राहणाऱ्या ग्रामस्थांची तक्रार नोंदवण्यासाठी होणारी फरफट थांबणार आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडीतील आदिवासी वाड्यांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मैलोन्मैल प्रवास करावा लागतो. काही ठिकाणी वाहन सुविधा किंवा बससेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना पायी प्रवास करून पोलीस ठाणे गाठावे लागते. मात्र आता या ग्रामस्थांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष तक्रार निवारण करणारी व्हॅन सुविधा उपलब्ध केली आहे. ही व्हॅन ग्रामीण भागातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अन्याय सहन न करता आपल्या समस्या मांडाव्यात हेच आमचे मुख्य उद्देश असून या व्हॅनमध्ये एपीआय, हवालदार, महिला व पुरुष अंमलदार अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
जनजागृती करणार, कायद्याची माहिती देणार
ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमातून ग्रामस्थांना सायबर फ्रॉड, लैंगिक छळ, ड्रग्जविरोधी मोहीम, बालविवाह, वेठबिगार समस्या याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच त्यावर लागू करण्यात आलेल्या नवीन कायद्यांची माहितीदेखील दिली जाणार आहे. या जनजागृती मोहिमेसाठी पोलीस विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्ये सादर केली जाणार आहेत
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List